
मुंबई, दि. 13 : नेतृत्व, वक्तृत्व, ज्ञान आणि मूल्ये यांची सांगड घालत तरूणांच्या माध्यमातून शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न अभिरूप युवा संसदेच्या माध्यमातून होत आहे. यशस्वी व्हायचे असल्यास प्रामाणिकपणा आणि चिकाटी असणे गरजेचे आहे. बालपणापासूनच सामाजिक वातावरणात सक्रिय असल्यास विचारधारा तयार होते. लोकशाहीची मूल्ये अभिरूप युवा संसदेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि युवक बिरादरी (भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिरूप युवा संसदीय अभियान’ राज्यभर राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत विजेत्यांचा सत्कार आणि सादरीकरणाचे आयोजन विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले. या सादरीकरणाचे परीक्षक म्हणून निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, अर्थतज्ज्ञ – शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ.भालचंद्र मुणगेकर, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, युवा बिरादरीच्या संचालक स्वरा क्रांती आणि आशुतोष शेट्ये यासह अभिरूप युवा संसदेतील तरूण उपस्थित होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
राज्यभर घेतलेल्या स्पर्धेतून विशेष तीन पारितोषिके प्रदान करण्यात आली. पहिले ५० हजार रुपयांचे पारितोषिक उस्मानाबादचे आशय येडगे, दुसरे ३० हजार रुपयांचे पारितोषिक पुण्याचे धीरज पुरोहित, तिसरे २० हजार रुपयांचे पारितोषिक पुण्याची सई वैद्य यांना प्रदान करून गौरविण्यात आले. विधिमंडळात सादरीकरण केलेल्या तरूणांमध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावलेल्या रमेश भागवत यास प्रथम पारितोषिक, निशांत पवार यास दुसरे, कोमल परिक हिस तिसरे पारितोषिक, अब्दुला मुजाहिद अली मोहम्मद आणि सलोनी पांडे यांना चौथे पारितोषिक तर प्रतिक पाटणकर यांना पाचवे पारितोषिक प्रदान करण्यात आले. नोव्हेंबरपासून राज्यभर सुरू असलेल्या या अभियानाअंतर्गत सहा लाखांची पारितोषिके वितरित करण्यात आली.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. सामाजिक भूमिकेतून तरूणांनी राजकारणात सहभागी व्हावे. संविधानाचा आदर, विधिमंडळ, न्यायव्यवस्था, शासन आणि माध्यमे यात संवाद राहिल्यास लोकशाहीचे भविष्य उज्ज्वल राहील असे सांगून त्यांनी या अभिरूप युवा संसदेतील तरूणांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात महिलांचा सहभाग वाढवावा, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
राज्यमंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, तरूणांनी उत्कृष्ट असे अभिरूप संसद त्यांच्या सादरीकरणातून उभे केले. त्यांच्या सादरीकरणातून विधानभवनातील या ऐतिहासिक वास्तुबद्दल आत्मीयता आणि अभिमान दिसून आला. कोशिक राऊत यांचे आरक्षणावरील विधेयक, प्रशांत वाघावे यांचे निर्माणस्नेही विधेयक आणि निशांत पवार यांचे तृतीयपंथीयांना आरक्षण मिळावे यासाठी मांडलेले विधेयक हे नवी दिशा देणारे आहे. लोकशाही चिरकाल टिकावी तसेच समाज परिवर्तनासाठी तरूण नवविचार मांडताना दिसत असल्याचेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले. कृषी, अर्थव्यवस्था अशा मूलभूत विषयांवर तारांकित प्रश्नांच्या माध्यमांतून अनेक तरूण सदस्यांनी प्रकाश टाकला. लोकशाहीची मूल्ये तरूणांमध्ये अधिकाधिक रूजविण्यासाठी असेच प्रयत्न भविष्यातही व्हावेत. यंदा २४ जिल्ह्यातून आणि ५० टक्के तालुक्यातून या संसदेत तरूण सहभागी झाले होते. भविष्यात ८० टक्के तालुक्यातून तरूणांचा सहभाग वाढावा यासाठी शासन सहकार्य करेल असे सांगून युवक बिरादरी या संस्थेस राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
अर्थतज्ज्ञ डॉ. मुणगेकर म्हणाले, राष्ट्राला कोणत्याही जाती-धर्म, रंग, वर्ण यानुसार भेदभाव नको तर समानता हवी आहे. आणि ती जगातील सर्वोत्कृष्ट संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशाला लाभली आहे. या स्पर्धेतील विजयापेक्षा तरूणांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असेही डॉ.मुणगेकर यांनी सांगितले.
निवृत्ती न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, मतपेटीतून क्रांती घडत असते. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांच्या हिताचे काम करणे होय.
वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री. मदाने म्हणाले, स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा दिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने प्रतिष्ठा आणि परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक सभागृहात अभिरूप युवा संसदेचे सादरीकरण होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेच्या स्वरूपात देशाला उत्कृष्ट कार्यप्रणाली दिली असल्याचे श्री.मदाने यांनी सांगितले.
स्वरा क्रांती म्हणाल्या, या अभियानात २४ जिल्ह्यामधून ५००० युवक-युवतींचा सहभाग होता. मूल्ये, कौशल्ये आणि ज्ञान यांची पारख करून स्पर्धा घेण्यात आली, त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानंतर औरंगाबाद, पुणे, अमरावती आणि नागपूर अशा चार विभागांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानंतर निवडलेल्या तरूणांना या अभिरूप युवा संसदेत मुंबईतील विधानभवनात सादरीकरणाची संधी प्राप्त झाली. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयावर गेली ४६ वर्षे चळवळीच्या माध्यमातून युवक बिरादरी ही संस्था कार्यरत असल्याचेही स्वरा क्रांती यांनी सांगितले.




