मोहाडी,दि.१८ः- परप्रांतातील धान आयातीवर बंदी असतानाही अधिक पैसा कमविण्याच्या लालसेने आलेला ५४२ क्विंटल धान मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथे एका भातगिरणीजवळ सुरू असलेल्या मोहाडी खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या शासकीय धान खरेदी उपकेंद्रात जप्त करण्यात आला . ही कारवाई मोहाडीच्या नवनियुक्त तहसीलदार (आयएएस) मीनल करणवाल व त्यांच्या चमुने केली. याप्रकरणी मोहाडी पोलिसानी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून दोन्ही ट्रक धानासह पोलिस स्टेशनमध्ये जमा केले आहेत.
मोहाडी तालुक्यात धान केंद्र सुरू झाले तेव्हापासून सर्वच धान केंद्रावर परप्रांतातून आणलेला धान खरेदी करणे सुरू आहे. मात्र संबधीत अधिकारी कारवाई करीत नाही. मोहाडीच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार यांनी प्रथमच तालुक्यात ही पहिली कारवाई केली आहे. मादोनीस जयनुल आपदीन रा. रंगोली उत्तरप्रदेश, रशीदअली शायदअली रा. कानपुर या दोन ट्रक चालकांसह मोहाडी खरेदी-विक्री सहकारी संस्थेचा कर्मचारी राकेश दत्तू पोटफोडे आणि सौराज भातगिरणीचे मालक बालचंद दमाहे व ईतर दोन यांच्याविरुद्ध मोहाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दोन आरोपींचे नाव कळू शकले नाही.
राज्यात धानाला अ ग्रेड – १८८८ रुपये , ब ग्रेड – १८६८ रुपये प्रती क्विंटल व ७00 रुपये बोनस मिळत असल्याने धान माफियांकडुन परप्रांतातील धान प्रति क्विंटल १७00 रुपयेप्रमाणे मोठय़ा प्रमाणात जिल्ह्यात आणला जात आहे. या धानाला राज्यात बंदी करण्यात आली आहे. असे असतानाही दोन ट्रकमधून ५४0 क्विंटल धान (किंमत ९ लक्ष ४२३ रुपये) मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील मोहाडी खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या आधारभूत धान खरेदी उपकेंद्रावर विक्रीसाठी आणण्यात आला होता. हा प्रकार तहसीलदार व पोलिस विभागाच्या लक्षात येताच ट्रक जप्त करुन मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक थेरे करीत आहेत. या प्रकरणात अधिक तपास केल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. या घटनेनंतरही दररोज परराज्यातून मोठय़ा प्रमाणात धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर येत आहे. याकडे जिल्हा पणन विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.




