
औरंगाबाद, दि.25, :- सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 360 कोटींचा आराखडा मंजूर केला असून औरंगाबाद शहराच्या सर्वांगिण विकासाबरोबरच आरोग्य, शिक्षण, उद्योग त्याचप्रमाणे पर्यटन आणि मानवी विकासासंदर्भात असणाऱ्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मियतेने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीदरम्यान केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाठ, अतुल सावे, प्रशांत बंब, अंबादास दानवे, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, नारायण कुचे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, महावितरणचे संचालक नरेश गिते, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासंदर्भात् असलेल्या योजना यामध्ये कृषी, आरोग्य त्याचप्रमाणे शिक्षण, रस्ते विकास याबाबतच्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर केला असून पालकमंत्री या नात्याने समन्वयातुन जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडु दिली जाणार नाही अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री.देसाई यांनी दिली.
बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले. यानंतर महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ‘स्मार्ट सिटीजन’ या अभियानाविषयी प्रास्ताविकात माहिती दिली. यानंतर ‘स्मार्ट सिटीजन’ या अभियानाच्या लोगोचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये शिक्षण, आरोग्य, स्त्री-पुरूष प्रमाण, उद्योग, सेवाक्षेत्र, पर्यटन या बाबींचा समावेश असलेला अहवाल सादर करण्यात आला. बैठकीदरम्यान औरंगाबाद येथील क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याबाबत त्याचप्रमाणे ग्रामीण रस्ते आणि पाणंद रस्ते, पैठण येथील संत विद्यापीठ, शहरातील अंतर्गत रस्ते, जिल्हा परिषद शाळांसाठी कुंपण, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांना मान्यता, नवीन केंद्रीय विद्यालय आणि आर्मी पब्लिक स्कुल सुरू करण्या संदर्भातील विविध मागण्यांवर नियोजन करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी केल्या. यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या विविध विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनकडे प्रस्ताव सादर करावेत. या बाबींच्या पुर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. सर्वांच्या तळमळीणे आणि आत्मियतेने जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही पालकमंत्री श्री.देसाई यांनी बैठकीच्या समारोप प्रसंगी दिली. यानंतर सभागृहातच जलजीवन मिशन आराखड्याचे सादरीकरण जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री.घुगे यांनी सादर केले. आज राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्याने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्वांनी जागरुक मतदार व नागरिक म्हणून प्रतीज्ञा घेतली.





