36.6 C
Gondiā
Wednesday, June 3, 2026
Home विदर्भ रिसोड पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली कार्यान्वित

रिसोड पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली कार्यान्वित

0
32

आधुनिक साधनांमुळे पोलिसांना कर्तव्य बजाविताना मदतपालकमंत्री शंभूराज देसाई

वाशिम, दि. २७ : कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलीस दल कोणत्याही प्रकारच्या संकटात रस्त्यावर उभा असते. कोरोना संसर्ग काळातही आपण हा अनुभव घेतला आहे. या पोलिसांना आधुनिक साधनांची मदत मिळाली, तर त्यांना काम करण्यास अधिक बळ मिळते, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. २६ जानेवारी रोजी रिसोड पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरणराव सरनाईक, रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार अजित शेलार, पोलीस निरीक्षक एस. एम. जाधव, उत्तमचंद बगडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार श्री. झनक यांनी सीसीटीव्ही प्रणालीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, रिसोड पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याने शहरातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेराच्यामाध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी मदत होणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सुद्धा या प्रणालीची मदत होणार आहे. या प्रणालीमुळे एकच पोलीस कर्मचारी शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवून ती नियंत्रित करू शकणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरा सोबत स्पीकरही लावण्यात आल्याने नियंत्रण कक्षातूनच रस्त्यावरील वाहनधारकांना सूचना देणेही शक्य होणार आहे. त्यामुळे पोलिसांना कमी मनुष्यबळाचा वापर करून वाहतुकीला शिस्त लावणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांच्या निवासस्थानांची अवस्था बिकट आहे, पोलिसांना चांगले घर मिळावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य सुविधांना प्रथम प्राधान्य देवून त्यावर अधिकाधिक निधी खर्च करण्यात आला. आगामी वित्तीय वर्षात पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न सोडविण्यासाठी भरीव तरतूद करण्याचा प्रयत्न राहणार आहे. या अंतर्गत रिसोड येथील पोलीस निवासस्थानांचा समावेश करण्यास प्राधान्य देणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.

आमदार श्री. झनक म्हणाले, रिसोड शहर सुरक्षित राहावे, यासाठी शहरात ३६ सीसीटीव्ही कॅमेरे व ६ स्पीकर बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरात सीसीटीव्ही बसविणे, ही काळाची गरज होती. यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल, असे त्यांनी सांगितले. रिसोड व मालेगाव तालुक्यातील पाच पोलीस ठाण्यांतील पोलीस निवासस्थानांची दुरवस्था झाली असून या निवासस्थानांसाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगितले.