40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत- पालकमंत्री शंभूराज देसाई

शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत- पालकमंत्री शंभूराज देसाई

0
36
  • रिसोड येथे ‘अपनी मंडी, अपना बाजार’चे उद्घाटन
  • किनखेडा येथील बालाजी शेतकरी उत्पादक गटाचा उपक्रम

वाशिम, दि. २८ : आपल्या शेतात पिकलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविला तर त्याचा शेतकरी आणि ग्राहकांनाही फायदा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. याकरिता कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात असून त्याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. २६ जानेवारी रोजी रिसोड येथे ‘अपनी मंडी, अपना बाजार’ या शेतमाल व शेतीनिविष्ठा विक्री केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार अॅड. किरणराव सरनाईक, रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चक्रधर गोटे, जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, उत्तमचंद बगडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘आत्मा’ अंतर्गत किनखेडा येथील बालाजी शेतकरी उत्पादक गटाने ‘अपना मंडी, अपना बाजार’ विक्री केंद्र सुरु केले आहे. याठिकाणी रिसोड तालुक्यातील शेतकरी, शेतकरी गटांनी उत्पादित केलेला भाजीपाला, शेतमाल विक्रीसाठी ठेवला जाणार आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वाजवी दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावा, यासाठी उभारण्यात आलेला ‘अपनी मंडी, अपनी बाजार’ ही अतिशय चांगली संकल्पना आहे. यामुळे शेतमालाला चांगला दर मिळण्यास मदत होईल, तसेच ग्राहकांनाही कमी दरात चांगला शेतमाल उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवावा, यासाठी शासनाच्या कृषि विभागाने विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन सुद्धा दिले जात आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळेल.

जिल्ह्यामधील अनेक शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रांविषयी संशोधनही केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीतील खर्च कमी करून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता यावी, यासाठी त्यांना आधुनिक व अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे बहुद्देशीय शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले. तसेच ‘अपनी मंडी, अपना बाजार’ सारखे नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले, तर आभार बालाजी शेतकरी उत्पादक गटाचे अध्यक्ष पंजाबराव अवचार यांनी मानले. यावेळी पालकमंत्र्यांनी फीत कापून ‘अपनी मंडी, अपना बाजार’चे उद्घाटन केले. तसेच याठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या शेतमालाची पाहणी केली.