
औरंंगाबाद, दि. 3- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणा-या आरोपींना अटक करा अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आज मंगळवारी एकदिवसीय सामुहिक रजा आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणा-या अधिका-यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार यांनी अवैध धंदे करणा-याविरूध्द कारवाईची मोहिम हाती घेतली होती. त्या कारवाईचा राग मनात धरून वैभव पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. नायब तहसीलदारावर झालेल्या या हल्याच्या घटनेमुळे महसूल विभागात काम करणा-या अधिका-यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैभव पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करणा-यांना अटक करा. महसूल कर्मचा-यांना अवैध धंदे करणा-यांकडून संरक्षण अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनावर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना औरंगाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे, सचिव सिध्दार्थ धनजकर, कार्याध्यक्ष संजय वारकड, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एन.भारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, तहसीलदार राहुल गायकवाड, एल.एन.लाड, नायब तहसीलदार सारिका कदम, योगीता खटावकर, वैशाली डोंगरजाळ, संतोष अनर्थे, शिवम राजपूत, सुरेंद्र देशमुख आदींच्या स्वाक्ष-या आहेत.





