
पुणे :- मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याचं चित्र आहे. कुठे पाळीव प्राण्यांवर तर कुठे माणसांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना आज आंबेगाव तालुक्यात घडली असून बिबट्याच्या हल्ल्यात एक मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे.
कळंब येथून लौकी गावाकडे निघालेले महेश दिनकर थोरात व सुदाम रामदास काळे (दोघेही रा.लौकी ता.आंबेगाव) हे आपल्या मोटरसायकलवर जात होते. मात्र वाटेत महेश थोरात गाडी चालवत असताना कानडे मळा परिसरात मोटरसायकलवर बिबट्याने हल्ला केला.
या हल्ल्यात सुदाम काळे यांच्या डाव्या पायाला तीन ठिकाणी व कमरेच्या वरच्या बाजूस जखमा झाल्या आहेत. हल्ला एवढा जोरदार होता की स्वेटर, शर्ट आणि बनियनच्या आतून अंगावर जखमा झाल्या आहेत. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे दोघेजण गोंधळून गेले होते. क्षणाचाही विलंब न करता दोघांनी आरडाओरड करून मोटारसायकल जोरात पळवत नेल्याने व प्रतिकार केल्यामुळे दोघांचा जीव वाचला आहे.
जवळपास 40 ते 50 फूट बिबट्या आमचा पाठलाग करत होता, असं काळे यांनी सांगितलं. डॉक्टर बाळकृष्ण थोरात यांनी जखमी सुदाम काळे यांच्यावर औषध उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यात या परिसरात तीन जणांना बिबट्याने जखमी केलं आहे.





