
औरंंगाबाद, दि.11- सातारा परिसरातील डोंगरावर असलेल्या गवताला आग लागल्याची घटना सायंकाळी सुमारास घडली. या परिसरातील डोंगरावर असलेल्या गवताला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविझ्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. डोंगराला आग लागल्यामुळे दुरूनच आगीचे लोळ उठतांना दिसून येत होते.
बीड बायपास रोडपासून जवळच असलेल्या या परिसरात अचानकपणे आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत डोंगरावरील गवताला आपल्या कावेत घेतले होते. डोंगरावरील गवताला आग लागल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. पदमपूरा येथील अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेवून रात्री उशिरापर्यंत डोंगराच्या गवताला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. अंधार असल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी जवान प्रयत्न करत होते.





