
औरंंगाबाद, दि.11- नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची आपण स्वतः गांभीरपणे दखल घेणार असून नागरिकांनी त्यांच्या काही तक्रारी व सूचना असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी केले आहे. छावणी पोलिस ठाण्यात आज पोलिस आयुक्तांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी पोलिस आयुक्तासमोर तक्रारींचा पाऊस पाडला.
पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांत सुसंवाद निर्माण व्हावा या उद्देशाने पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या संकल्पनेतून छावणी पोलिस ठाण्यात आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनता दरबारास पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, छावणी विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक सराफ, छावणी पोेलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे आदींची यावेळी उपस्थिती होती. पोलिस व नागरिक स्नेहमिलनासाठी परिसरातील महिला, जेष्ठ नागरिक पुरुष, युवक, युवक देखील उपस्थित होते. यावेळी अनेक भागात नशाखोरी, अवैध दारू विक्री, रोडरोमियोचा महिलांना होणार त्रास, दुचाकी चो-यांचे वाढते प्रमाण तर अनेकांच्या जमिनी बलकावल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिस आयुक्तांसमोर मांडल्या.
पडेगाव येथील मुख्य रस्त्यावर वाहनाचा वेग जास्त असल्याने वृध्द महिला, आणि लहान मुलांना रस्ता ओलांडतांना त्रास होतो. रस्ता ओलांडण्याच्या गडबडीत अनेकदा या ठिकाणी अपघात झाले असून या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत अशी मागणी पडेगाव येथील माजी नगरसेवक सुभाष शेजवळ यांनी केली. तर वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस मित्र संकल्पना राबवावी अशी मागणी डॉ.निलेश अंबरवाडीकर यांनी याप्रसंगी केली. छावणीतील जनता दरबारात नागरिकांनी यावेळी तक्रारींचा पाऊस पाडला.





