
औरंगाबाद, दि.23- मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अ ब क ड करण्यात यावे. बार्टीच्या धरतीवर मातंग समाजासाठी आर्टीची स्थापना करण्यात यावी. अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरु करुन एक हजार कोटीचे भागभांडवल द्यावे. दलित-अल्पसंख्याक-आदीवासी भटके समाजातील लाभार्थ्यांचे विविध महामंडळाकडून घेतलेले कर्ज माफ करावे. मातंग समाजातील महिला पुरुषांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत शासनाने त्वरीत कठोर कारवाई करावी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावे. ख्रिश्चन समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. लवकर या मागणी मान्य झाले नाही तर दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे, सुरेश चव्हाण, प्रा.पुष्पलता सकटे, सौ.लक्ष्मीताई पवार, शंकर महापूरे, सुरेश कांबळे, विकास बल्लाळ, बापूराव उधारे, सचिन दाभाडे, सिध्दार्थ सदाफुले, संतोष चांदणे, रवि बल्लाळ, बापुराव बळेकर उपस्थित होते.





