
किराना मर्चँट, कपडा, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक व अन्य बाजारपेठ कडकडीत बंद राहणार…
औरंगाबाद, दि.24-26 फेब्रुवारी रोजी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला पाठिंबा देत यामध्ये औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ व सलग्ण संघटना सहभागी होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, मराठवाडा चेंबर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी दिली आहे.
महापालिकेच्या वतीने व्यापाऱ्यांना लावण्यात येणारा व्यवसाय परवाना घेण्यास विरोध केला आहे. जीएसटी कायद्यातील जाचक अटी व तरतुदी विरोधात हा बंद देशव्यापी व्यापाऱ्यांनी पुकारला आहे. केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागच्या दाराने इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न करत आहे. जीएसटी कायद्याच्या मसुद्यात असलेल्या जटील तरतुदी व जाचक अटीच्या विरोधात बंदला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड ट्रेड, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. भारत बंदला देशातील चाळीस हजार संघटना, आठ करोड व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. सर्व व्यापारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून जाचक अटीच्या विरोधात लढा पुकारला आहे. त्यांनी मागच्या दाराने पुन्हा एकदा इन्स्पेक्टर राज आणून भ्रष्टाचाराला खतपाणी न देता जीएसटी मधील कुठलीही सुनावणी न करता किंवा नोटीस न देता माल जप्त करणे, जीएसटी रद्द करणे, रिटर्न्स भरु न देणे, गुन्हे दाखल करणे इत्यादी कलमांमध्ये संशोधन करून व्यापाऱ्यांना जीएसटी रिटर्न सुलभतेने भरता येतील असे कायद्यात बदल घडवून आणावे. सर्व तालुका, ग्रामीण, शहर संघटना, सर्व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी आपली प्रतिष्ठाने बंद करुन भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन व्यापारी महासंघाने केले आहे. कँटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अजयभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे. यावेळी तनसूख झांबड, लक्ष्मीनारायण राठी, विजय जैस्वाल, सरदार हरिसिंग, संजय कांकरिया, युसूफ मुकाती, जयंत देवळाणकर, गुलाम हक्कानी, कचरु वेलंजकर आदी उपस्थित होते.




