
वृत्तसंस्था/मुंबई–अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यास तीव्र विरोध करत विरोधी पक्षनेत्यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून वॉकआऊट केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे पळपुटे सरकार असल्याचे नमूद करत जोरदार टीकास्त्र सोडले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १0 मार्च या कालावधीत घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पहिल्या आठवड्यात ५ दिवस तर दुसर्या आठवड्यात ३ दिवस कामकाज होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल व राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्च रोजी सादर करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत झाला. बैठकीतून विरोधी पक्षाचे नेते निषेध नोंदवून बाहेर पडले. पूर्ण अधिवेशन व्हायला हवे. त्याला कात्री लावली जाऊ नये, असे विरोधकांचे म्हणणे होते. मात्र ते मान्य करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी वॉकआऊट केले. नंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या हेतुविषयी शंका घेतली व गंभीर आरोप केले.
कोरोनाचा धोका वाढत असल्याचे कारण सांगून अधिवेशनाचे दिवस कमी करण्यात आले आहेत. ही फार गंभीर बाब आहे. यांचे मंत्री १0 हजाराची गर्दी जमवतात तेव्हा कोरोना नसतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोनाची भीती दाखवली जाते. तुमचे कोरोनाबाबतचे सल्ले फक्त आमच्यासाठीच आहेत का?, असा खरमरीत सवालच फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता विचारला. सरकार अर्थसंकल्प मांडणार पण त्यावर चर्चा होऊ देणार नाही हे बेकायदेशीर आहे. पूर्ण अधिवेशन व्हायलाच हवं ही आमची मागणी आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत ते आम्हाला मांडायचे आहेत. मात्र, कामकाजापासून पळ काढायचा असे सरकारने आधीच ठरवलेले आहे आणि म्हणून आज आमचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही. आता लेखा अनुदान घ्या आणि कोरोना कमी झाला की पूर्ण अर्थसंकल्प मांडा अशी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती पण ती धुडकावून लावण्यात आली.




