
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या उध्दव ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त राहणार असल्याचे व्टिट गृहमंत्री अनिल देशंमुख यांनी केले आहे.
अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित API सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडमोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी देण्यात आली आहे.
पोलीस दलाबाबत सरकारचा मोठा निर्णय
– हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
– रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
– संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी
– परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी राहणार आहे.
पवारांचा परम बीर सिंहांना हटवण्याचा आग्रह
दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात (Mansukh Hiren death case) परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असल्याचं बोललं जातं.





