मुंबई(वृत्तसंस्था)-भांडुप परिसरात एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर बनवलेल्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री 12 वाजता आग लागली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल 70 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केले आहे. फायर ब्रिगेडच्या 23 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी पोहोचल्या. 13 तासांच्या प्रयत्नानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले नाही. बचावकार्य अद्यापही सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी पोहोचले आहेत.
मृत्यू झालेले लोक हे व्हेंटिलेटरवर होते : मुख्यमंत्री
घटनास्थळी पोहोचलेले उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जो जबाबदार आहे, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. दुर्घटनेत मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई दिली जाईल. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, ते सर्व व्हेंटिलेटरवर होते. या दुर्घटनेचा बळी ठरलेल्यांच्या कुटुंबाविषयी संवेदना व्यक्त करतो आणि त्यांची माफी मागतो.’

आगीचे कारण अस्पष्ट
मुंबईच्या महापौर किशोरी पेडनेकर म्हणाल्या की, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी म्हटले की, मी पहिल्यांदा मॉलमध्ये हॉस्पिटल पाहिले. या प्रकरणात कारवाई करण्यात येईल. त्यांनी सांगितले की, रुग्णालयात कोव्हिड रुग्णांसह 76 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे.


