
अर्जुनी-मोरगाव : महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता शासन व प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून जनतेला सावध करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरु आहेत. जनतेने शासन-प्रशासनाच्या नियम व अटीनुसार स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. आवश्यक कामानिमित्तच घराबाहेर जावे, नियमित मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना विषाणूचा संसर्ग टाळावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले आहे.
अर्जुनी-मोरगावच्या उपविभागीय कार्यालयात 26 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याबाबत व उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याबाबत तालुका टास्कफोर्सची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
सभेला तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.घरतकर, गटविकास अधिकारी राजू वलथरे, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी शिल्पा राणी जाधव, पोलीस निरीक्षक महादेव तोदले, नवेगावबांधचे पोलीस निरीक्षक हेगडकर, केशोरीचे पोलीस निरीक्षक इंगळे, डॉ.खोब्रागडे, डॉ.बारसागडे, डॉ.श्वेता कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी मांढरे व इतर विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावर्षी होळी, धुलीवंदन व रंगपंचमी अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याबाबत व लाऊडस्पीकरद्वारे नगरपंचायतसह ग्रामीण क्षेत्रात लोकांना आवाहन करण्याच्या सूचना मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या. त्यानंतर टास्कफोर्सद्वारे अर्जुनी-मोरगाव येथील मार्केटमध्ये जावून मास्क न लावणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.




