
औरंगाबाद, दि.29 मार्च-31 मार्च रोजी औरंगाबाद शहरात लॉकडाऊनच्या विरोधात खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी पैठणगेट येथून दुपारी तीन वाजता भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव जनसामान्यांसाठी आवाज उठवण्यासाठी खासदारांच्या समर्थनात उतरले आहेत. सोशलमिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल करुन रायभान जाधव विकास आघाडीचे कार्यकर्ते व स्वतः मोर्चात सहभागी राहणार आहे. एकीकडे मोठे उद्योग सुरु ठेवत, विमान कंपन्या नियमाचे पालन न करता आपला व्यवसाय करत आहे. दुसरीकडे छोटे उद्योग, हॉटेल, ठेलेवाले, ऑटोचालक, कामगार, पानटपरी, फळ विक्रेते यांचे उद्योग लॉकडाऊनमध्ये बंद करुन गरीबांचे हाल करत आहे. अगोदरच कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जनसामान्यांच्या हक्कासाठी कोणी लढत असेल तर जातभेद विसरून साथ देण्याची गरज आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. सर्व जाती धर्माचे लोकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.