डीजीआर रद्द झाल्यानंतरही सुरक्षारक्षकांना रोजगार नाही;आंदोलन सुरूच

0
15

गोंदिया ता.1- आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी मागच्या अडीच महिन्यापासून बिरसी परिसरातील स्थानिक सुरक्षा रक्षक आपल्या कुटुंबासहित आंदोलनाला बसले आहेत. स्थानिक सुरक्षारक्षकांना अडसर ठरत असलेले डी जी आर सुद्धा आत्ता रद्द झालेले आहे. परंतु तरीही विमानतळ प्रशासनाने या सुरक्षारक्षकांना कामावर घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांत विमानतळ व जिल्हा प्रशासनाविरोधात रोष दिसून येत आहे.

डिजीआर हा स्थानिक सुरक्षारक्षकां साठी अडसर ठरत होता. त्याचाच आधार घेत विमानतळ प्रशासनाने स्थानिक सुरक्षारक्षकांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. परंतु आता या प्रकल्पातून डीजीआर रद्द झाला आहे. त्यामुळे बंद केलेल्या सुरक्षारक्षकांना पुन्हा कामावर घेऊन आंदोलन समाप्त करणे हे विमानतळ व जिल्हा प्रशासनाचे आद्य कर्तव्य होते. परंतु तसे न करता विमानतळ प्रशासनाने या सुरक्षारक्षकांना पुन्हा कामावर घेण्यासाठी साफ मनाई केले आहे असा आरोप या सुरक्षारक्षकांनी लावला आहे.
सदर प्रकल्प विस्तारित होत असताना येथील स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार, असे आश्वासन तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या परिसरातील जनतेला दिले होते. परंतु त्यांच्या या आश्वासनाला विमानतळ अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी वरही या परिसरातील जनतेचा विश्वास उरला नाही. विमानतळ प्रशासन स्थानिक जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय करीत असून या अन्यायाला जिल्हा प्रशासन सुद्धा पाठबळ देत असल्याचा आरोप सुरक्षारक्षकांनी लावला आहे. मागच्या अडीच महिन्यापासून सदर आंदोलन अविरत सुरू असून या सुरक्षारक्षकांना पुन्हा कामावर घेऊन
या आंदोलनातून तोडगा काढण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी तसेच सुरक्षारक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे लावून धरली आहे.