भरधाव ट्रकने आठ लोकांना चिरडले,तीन ठार, ५ गंभीर 

0
32

रायगड,दि.01ः-  भरधाव ट्रकचालकाने तब्बल 8 जणांना चिरडले . यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेवदंडा ते चणेरा मार्गावर बराच वेळ हा अपघाताचा थरार सुरु होता. ट्रकचालकाला चांडगावनजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. लक्ष्मण ढेबे, उद्य वाकडे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अन्य एका मृताचे आणि जखमींची नावे समजू शकले नाहीत.मिळालेल्या माहितीनुसार, रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहाच्या दिशेने जाणा-या भरधाव ट्रक चालकाने साळाव, आमली येथे प्रत्येकी एकाला, तर चेहेर येथे दोन पादचाऱ्यांना धडक देत जखमी केले. त्यानंतर हा ट्रक रोह्याच्या दिशेने निघाला. तोपर्यंत पुढच्या गावात या घटनेची माहिती मिळाल्याने स्थानिकांनी ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तसाच तो पुढे सूसाट सुटला. न्हावे फाटानजीक दुचाकीवर जाणा-या जोडप्याला आणि त्यांच्या मुलाला ट्रकने उडवले.
यात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लक्ष्मण ढेबे व त्यांचा मुलगा जागीच ठार झाला असून, त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की शिक्षकाच्या गाडीचा चक्काचूर झाला असून, गाडी सुमारे चारशे मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली होती. त्यानंतर ट्रकचालकाने सारसोली गावाच्या पुढे चणेरा येथील नागरिक उदय वाकडे याला ठोकरल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.