संपर्क शोध मोहिम अधिक गतिमान करा- जिल्हाधिकारी संदीप कदम

0
30
  • कोविडचा आढावा

भंडारा, दि.1:- कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील व्यकींची शोध मोहिम (काँटॅक्ट ट्रेसिंग) अधिक गतिमान करून संपर्कातील व्यक्तीचीही टेस्टिंग करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यंत्रणेला दिले. आज भंडारा जिल्ह्याचा कोरोना विषयाचा आढावा दूर दृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रोज सकाळी कोरोनाचा तालुकानिहाय आढावा घेतात. आजच्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, गट विकास अधिकारी नूतन सावंत, डॉ. माधुरी माथूरकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते.

            सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून भंडारा व पवनी तालुक्यात रुग्ण संख्या अधिक आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची टेस्ट करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, काँटॅक्ट ट्रेसिंग हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत होणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष होता कामा नये. यासाठी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेता येईल असे ते म्हणाले.

            कोविड टेस्टिंग करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, उद्योग व कारखाना याठिकाणी सुद्धा टेस्टिंग कॅम्प लावण्यात यावेत. काल जिल्हाभरात 63 शिबिरात कोविड चाचण्या करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. रुग्णांची डाटा एंट्री वेळेत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

  लसीकरण केंद्राला भेटी द्या

            जिल्ह्यात 128 केंद्रावर कोविड लसीकरण सुरू असून आजपासून 45 वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली आहे. जास्तीत जास्त व्यक्तींनी लस घ्यावी यासाठी गावातील नागरिकांना प्रोत्साहित करण्यात यावे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी लसीकरण केंद्राला भेटी द्याव्यात व अडचणी जाणून घ्याव्यात असे त्यांनी सांगितले. प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. डॉक्टरची चिठ्ठी असल्याशिवाय पॅरासिटामल व कफ सायरफ ही औषध मेडिकलमधून देऊ नये असे मेडिकल असोसिएशनच्या कालच्या बैठकीत ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. मेडिकल स्टोअर्सला भेट देऊन याबाबत खात्री करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

लसीकरण केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज सिल्ली व  मानेगाव बाजार येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके होते. लसीकरण केंद्राची पाहणी करून त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. गावातील अन्य नागरिकांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा असे आवाहन त्यांनी लाभार्थ्यांना केले.