
गोंदिया,दि.02 –राज्यात सध्या शासकीय अधिकारी असो की कर्मचारी मोठ्या मानसिक तणावात नोकरी करीत असताना दिसून येत आहे.गेल्या मार्च महिन्यात 3 महिला अधिकार्यांनी आपली जिवनयात्रा वरिष्ठ अधिकार्याच्या त्रासाला व मानसिक तणावामुळे संपविली.त्यातच गोंदिया जिल्ह्यातील 1 ग्रामविकास अधिकायानेही पंचायतीच्या सरपंचपतीमुळे आत्महत्या केल्याचे प्रकरण थंड व्हायचे असतानाच जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कार्यरत असलेले लिलेंद्र पटले यांची आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे सेवा घेण्यात आली असून उपमुख्य कार्यकारी(पंचायत) अधिकारी यांनी कार्यमुक्त केले आहे.त्यामुळे एकच कर्मचारी दोन-दोन विभागाचे कामे कसे करणार हा प्रश्न सुध्दा उपस्थित झालेला आहे. श्री पटले यांना उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागातून कनिष्ठ कर्मचार्याच्या मोबाईलवरुन बोलावून तुला येथेच काम करावे लागेल, जर काम करायचे नसेल तर आपला राजीनामा दे,तु कसा काम करीत नाही,मी बघतो असे बोलल्याने पटले हे खुपच मानसिक तणावात आलेले आहेत.त्यातच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिले असून त्या नोटीसीआधीच पटले यांनी आपल्या वरिष्ठांना आणि पत्नीच्या नावे पत्र लिहित आपणास दिलेल्या मानसिक त्रासामुळे तणावात असून माझे काही बरे वाईट झाले तर विभागप्रमुखच त्यास जबाबदार राहणार असा उल्लेख केल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्यानी म्हटले आहे.
लिलेंद्र पटले नामक कर्मचार्यानेही आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करीत आपल्या जिवाचे बरेवाईट झाल्यास आपल्या विभागाच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात यावे असे पत्रच मुख्य कार्यकारी अधिकारीसह जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाकडे दिल्याने एकच खळबळ माजली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पी.जी.शहारे व सचिव शैलेष बैस यांनी दिलेल्या माहितीनुसार लिलेंद्र पटले या कर्मचार्याने यासंदर्भातील पत्र संघटनेला दिले असून संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन त्वरीत कारवाईची मागणी करण्यात आल्याचे म्हटले आहे.कर्मचार्याला विनाकारण मानसिक त्रास देऊन त्यास नोकरी सोडण्यासाठी दबाव घालण्यात येत असले तर अशा अधिकार्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.सोबतच काही वर्षापुर्वी पंचायत विभागातील दरवडे नामक कर्मचारी यांना मोठया प्रमाणात मानसिक त्रास संबधित विभागातील अधिकार्याने दिल्यामुळेच त्या त्रासामुळे तो कर्मचारी एवढा तणावात गेला की त्याचा मृत्यू झाला होता. तीच परिस्थिती पुन्हा उदभवण्याची शक्यता निर्माण झाली असून अशा अधिकार्याना त्वरीत शासनाने मुख्य प्रवाहातील कामकाजातून बाहेर काढावे अशी माागणी करावी लागणार असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे आक्टोंबर 2015 मध्ये पंचायत विभागातील दरवडे नामक कर्मचार्यांला मोठया प्रमाणात मानसिक त्रास संबधित विभागातील अधिकार्याने दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यावेळी त्याचा कुटुबियांनी केला होता.कारण मृत्यूच्या आदल्या दिवशी त्या कर्मचार्याला फोनवरुन दमदाटी करण्यात आल्याचे त्याच्या कुटुबियांनी त्यावेळी म्हटले होते.त्यावरुन तो कर्मचारी तणावात गेला की त्याचा मृत्यू झाला होता, तीच परिस्थिती पुन्हा उदभवण्याची शक्यता निर्माण होण्याची भिती जिल्हा परिषदेच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.