
पुणे | कुख्यात गुंड गजा मारणे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला होता. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर निघालेली मिरवणूक आणि लोकांमध्ये पसरवलेली दहशत यावरून गजा मारणे हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं होतं. त्यानंतर पुणे परिसरात अनेक गुंडांच्या टोळ्या सक्रिय होत होत्या. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी आक्रमकपणे कायद्याचा धाक दाखवत मोक्का अंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.
शहरातील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन महिन्यात पुणे शहरातील 20 गुंड टोळ्यांवर ही कारवाई केली गेली आहे. मार्च मध्ये पोलिसांनी 10 टोळ्यांवर कारवाई करत 89 जणांवर मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान, शहरात गुंड टोळ्यांची दहशद खपवून घेतली जाणार नाही. यापुढे गुंड टोळ्या आणि साक्षीदारांविरोधात कडक कारवाई सुरूच ठेवली जाईल. गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांचे पाठीराखे यांच्या कुंडल्या पोलिसांकडे तयार आहेत, अशा कडक शब्दात पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांना सुनावलं आहे.