
अर्जुनी-मोरगाव : भारतीय सेनेच्या थर्ड बटालियनचे शहीद रायफल मॅन अतिराज बाबुराव भेंडारकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा तालुक्यातील ग्राम खांबी येथे पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश शिवणकर होते.
खांबी येथील अतिराज बाबुराव भेंडारकर हे भारतीय सैन्यामध्ये दाखल झाले होते. आसाम येथे कर्तव्यावर असताना 23 मार्च 2019 रोजी ते शहीद झाले. त्या प्रीत्यर्थ त्यांचे खांबी येथे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मातृभूमीप्रती अतिराज यांच्या बलिदानाची ज्योत सदैव तेवत राहावी, युवकांना शहिदांचे बलिदान प्रेरणादायी ठरावे, मातृभूमीच्या संरक्षणाकरिता प्रत्येक भारतीय युवकाने सैन्यामध्ये दाखल होऊन देशसेवेचा विडा उचलावा, असे विचार सरपंच प्रकाश शिवणकर यांनी या वेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद अतिराज यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली. या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवान मेंढे, पोलीस पाटील नेमीचंद मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लायकराम भेंडारकर, रवींद्र खोटेले, देविदास कोसरे, घनश्याम भेंडारकर, नारायण भेंडारकर, अमृत उरकुडे, अनिल शिवणकर, राकेश कोसरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.