
अर्जुनी-मोरगाव (संतोष रोकडे) : कोरोना विषाणू बाधित रुग्ण आरोपी आनंदराव उर्फ अमित कुमार बाळबुदे (वय 61 वर्षे) रा. प्रभाग क्रमांक-9, अर्जुनी-मोरगाव याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 188, 269 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अर्जुनी-मोर नगरपंचायत मुख्याधिकारी शिल्पा राणी जाधव यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील आरोपी कोरोना विषाणू पॉजिटिव असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 21 मार्च ते 6 एप्रिल 2021 पर्यंत होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. त्या अनुषंगाने 2 एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसहा वाजतादरम्यान फिर्यादी शिल्पा राणी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत, डॉ.खोब्रागडे, नगर पंचायत कर्मचारी दीपक राऊत, नयनकुमार शहारे, रमेश कुबरे, राकेश शहारे, अनमोल जाधव, पोलीस अंमलदार बेहेरे, पोलीस शिपाई चौधरी हे सर्व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गृह विलगीकरणातील रुग्णाची तपासणी करण्याकरिता धडक मोहीम राबवित होते. त्या दरम्यान ते आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली असता सदर रुग्ण हा घरी हजर मिळाला नाही. त्याच्या पत्नीस विचारपूस केली असता तो शेतावर गेल्याचे सांगितले. सदर रुग्ण कोरोना पॉझिटिव असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आरोपी घराबाहेर निघून फिरत असल्याने वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.
त्याला कोरोना हा संसर्गजन्य रोग झाल्याचे माहीत असूनसुद्धा तो घराबाहेर निघाला. त्यामुळे त्याच्या संपर्काने इतरांना या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. याबाबत माहिती असूनही बाहेर पडल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुनी-मोरगावचे ठाणेदार महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलीस शिपाई गोंडाणे पुढील तपास करीत आहेत.





