34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राष्ट्रीय देश काश्मिरात सात अतिरेक्यांचा खातमा

काश्मिरात सात अतिरेक्यांचा खातमा

0
47

blank

श्रीनगर, 
जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ आणि पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी सात अतिरेक्यांना ठार मारले. यात पाकधार्जिण्या अन्सार गझवतुल हिंदचा म्होरक्या इम्तियाज अहमद शहाचाही समावेश आहे. यात चार जवान जखमीही झाले आहेत.

गुरुवारी सायंकाळपासूनच लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली होती. शोपियाँमधील चकमकीत पाच अतिरेक्यांना ठार मारण्यात आले, तर पुलवामाच्या त्राल येथे अन्य दोन अतिरेक्यांचा सफाया करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने शुक्रवारी दिली.

शोपियाँ जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी चकमक सुरू झाली होती. पाच पैकी दोन अतिरेक्यांनी एका मशिदीत आश्रय घेतला. मशिदीचे नुकसान टाळण्यासाठी चकमक थांबविण्यात आली आणि अतिरेक्यांना शरण येण्यास सांगण्यात आले. हे दोघेही सख्खे भाऊ होते. आज सकाळी स्थानिक इमामला अतिरेक्यांना शरण आणण्यासाठी मशिदीत पाठविण्यात आले. मात्र, अतिरेकी त्यांनाही जुमानले नाही. त्यामुळे मशिदीचे कुठलेही नुकसान होऊ न देता जवानांनी योजनाबद्ध कारवाई केली आणि यात दोघेही ठार झाले, असे अधिकार्‍याने सांगितले.

पुलवामाच्या त्राल भागात दोन अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला वेढा दिला होता. आज सकाळी जवानांना पाहताच अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी झडलेल्या चकमकीत दोन्ही अतिरेक्यांना ठार करण्यात आले, असे अधिकारी म्हणाला.

blank