34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News तापदायक! निगेटीव रुग्णाला धाडले कोविड सेंटरला- डॉ. पाटील यांचा गलथानपणा

तापदायक! निगेटीव रुग्णाला धाडले कोविड सेंटरला- डॉ. पाटील यांचा गलथानपणा

0
89

blank

देवरी तालुक्यातील प्रकारः डॉक्टरांच्या आततायीपणामुळे अख्खे कुटुंब संकटात

देवरी(गोंदिया), 18 एप्रिल : जगभरात कोविड-19 विषाणूने उच्छाद मांडला असताना आरोग्य सेवां या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्या आहेत. कोविडच्या रुग्णांना संसाधनाअभावी अनेक ठिकाणी जीव गमवावा लागत असल्याचेही समोर येत असताना देवरी येथे एक संतापदायक प्रकार समोर आला आहे. कोविड-19 चाचणी निगेटीव आली असताना देवरीतील सचिन भांडारकर याला डॉ. अमोल पाटील यांनी धमकावून कोविड सेंटरला धाडल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे. याउलट चाचणी सकारात्मक येणाऱ्या रुग्णाला घरीच ठेवल्याने अख्खे कुटुंबीय तर कोविड सेंटर मधील औषधोपचार आणि सकारात्मक रुग्णांच्या सहवासामुळे सचिन सुद्धा दहशतीखाली आला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीप्रमाणे, देवरीच्या परसटोला परिसरात राहणाऱ्या सचिन भांडारकर यांनी गेल्या 12 तारखेला देवरीच्या कोविड सेंटरवर आपले काका समवेत आरटीपीसीआर चाचणी करवून घेतली. सचिन हा देवरी येथे एका कंपनीत कर्मचारी असल्याने त्याला चाचणी आवश्यक असल्याचे सचिनचे म्हणणे आहे. त्याआधी सचिनने आपल्या इतर कुटंबीयासमवेत गेल्या 2 तारखेला गोंदिया येथे सुद्धा चाचणी केली. याशिवाय देवरी येथे सुद्धा गेल्या 9 तारखेला आरएटी चाचणी करवून घेतली. या दोन्ही चाचण्या नकारात्मक आल्याचे सचिनचे म्हणणे आहे. मात्र, कार्यालयाला तपासणी अहवाल आवश्यक असल्याने त्याने त्याचे काका समवेत देवरी येथे गेल्या 12 तारखेला आरटीपीसीआर चाचणी करवून घेतली. या चाचणीच्या अहवालासाठी रुग्णालयाचे अनेक खेटे घातले. असे असताना गेल्या 16 तारखेला सुमारे 11 वाजेच्या सुमारास डॉ अमोल पाटील यांनी सचिनला फोन करून त्याची चाचणी सकारात्मक असल्याचे सांगत विलगीकरण कक्षात राहण्याविषयी सांगितले. यावर सचिनने चाचणी अहवालाची मागणी केली असता तो तुला देता येत नसल्याचे डॉ पाटील यांनी सचिनला म्हटले. यावर सचिनने डॉ. पाटील यांना मी व माझा काका दोघांनी तपासणी केली असून एकच फोन नंबर दिल्याचे सांगत खात्री करण्याची विनंती करताच डॉ. पाटील यांनी सचिनला गुमान कोविड सेंटरला दाखल हो अन्यथा तुझ्यावर मी स्वतः गुन्हा दाखल करून कोविड सेंटरला नेईल, अशी धमकी दिल्याचे सचिनचे म्हणणे आहे.

यावर सचिन स्वतः देवरीच्या कोविडसेंटर मध्ये दाखल झाला. तेथे रुग्णासाठी अव्यवस्था असून त्याला कित्येक तास बेडशिवाय राहावे लागल्याचे सचिनचे म्हणणे आहे. तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका कमांडर यांना कळविल्यानंतर त्याच्यासाठी कशीबशी बेडची व्यवस्था करण्यात आली. मात्र, सचिनला त्याचा कार्यालयात अहवाल पाठविण्यासाठी चाचणी अहवाल पुरविण्यात आला नाही. चाचणी अहवालाशिवाय आणि कोणतेही लक्षणे नसताना सचिनवर औधोपचार करून सकारात्मक रुग्णाच्या सानिध्यात राहावे लागले. दुसऱ्या दिवसी सचिनला त्याची चाचणी नकारात्मक असल्याचे कळले. यावर आपले पितळ उघडे पडू नये, म्हणून डॉक्टरांनी त्याची फेरचाचणी न करता सोडून दिले.

सचिनच्या म्हणण्यानुसार त्याने डॉ. पाटील यांना वारंवार विनंती करूनही आपली मनमानी करीत त्यांला विनाकारण कोविंड सेंटरमध्ये डांबले, तर उलट सकारात्मक चाचणी आलेल्या त्याच्या काकाला वाऱ्यावर सोडले. परिणामी, सकारात्मक चाचणी आलेला रुग्ण हा त्यांच्या कुटुंबीयासह इतरांच्या संपर्कात आल्याने व सचिनला नाहक विलगीकरण केेंद्रात डांबल्याने त्याचे कुटुंबीय संकाटात आल्याचा आरोप सचिनने केला आहे. यामुळे मानसिक त्रास झाल्याने व जीविताची भीती निर्माण झाल्याने अशा आततायीपणा करणाऱ्या डॉ. पाटील विरोधात देवरी पोलिसात तक्रार दाखल केली असून योग्य कार्यवाहीची मागणी केली आहे. या प्रकरणी शासनप्रशासन कोणती कार्यवाही करते, याकडे देवरी तालुकावासींयांचे लक्ष लागले आहे.

एकच फोन नंबर दिल्याने चुकी झाली- डॉ ललित कुकडे , तालुका आरोग्य अधिकारी

याविषयी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांचेकडे प्रकरणाची विचारणा केली असता त्यांना झालेली चुक मान्य करीत सचिन व त्याच्या काकांनी एकच फोन नंबर दिल्याने गोंधळ झाल्याचे सांगितले. सचिनला कोविडसेंटर मधून डिस्चार्ज दिला असून त्याचे काकांवर औषधोपचार सुरू असल्याचे सांगितले.

blank