
अहमदनगर,दि.19: करोनाचा संसर्ग झालेले आणि गृहविलगीकरणातील रुग्ण बिनधास्त बाहेर फिरत असल्याने ससंर्गाचा प्रसार होतो, असे सांगण्यात येते. यावप नियंत्रणासाठी भाजपचे श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी एक उपाय सुचविला आहे. करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी पाचपुते यांनी सरकारकडे केली आहे.
‘करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा यद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र, त्यात अडचणी येत आहेत. त्यातील प्रमुख अडचण बिनधास्त फिरणाऱ्या रुग्णांची आहे. ते सुपर स्प्रेडर ठरत आहेत. आपला संसर्ग लपवून बाहेर फिरल्याने ते इतरांना संक्रमित करीत आहेत. या सर्व रुग्णांची माहिती आरोग्य आणि महसूल विभागाकडे असते. त्यांची नावे जाहीर केली तर इतरांना त्यांच्याबद्दल माहिती होईल. त्यांच्यापासून सुरक्षित राहता येईल. ग्रामीण भागात एकमेकांना ओळखणाऱ्यांची संख्या जास्त असते. तेथे याचा नक्कीच उपयोग होईल. त्यामुळे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका यांच्याकडून या रुग्णांची नावे जाहीर केली जावीत. त्यामुळे त्यांच्याही फिरण्यावर मर्यादा येतील. अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी आपल्याला संसर्ग झाल्याचे स्वत: होऊन जाहीर करतात. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करतात. त्यामुळे लोकही त्या काळात त्यांच्याकडे जात नाहीत. सामान्य रुग्णांच्या बाबतीत असे होत नाही. त्यामुळे त्यांचीही नावे जाहीर करण्याची पद्धत सुरू केली तर याला आळा बसू शकेल,’ असे पाचपुते यांनी म्हटले आहे.




