32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राष्ट्रीय देश गुंतवणूकदार चिंताग्रस्तः विक्रीचा सपाटाः निर्देशांक कोसळले

गुंतवणूकदार चिंताग्रस्तः विक्रीचा सपाटाः निर्देशांक कोसळले

0
35

blank

मुंबई,दि.24 : देशात करोना व्हायरसने प्रशासनाला जेरीस आणले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दैनिक रुग्णसंख्या तीन लाखांवर पोचली असून आर्थिक अनिश्चितेत वाढ झाली आहे. या संकटामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल या भीतीने गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून पैसे काढून घेण्यास सुरवात केली आहे. आज शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली आहे.

सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५३ अंकांनी घसरला असून तो ४९१२७ अंकावर आहे. त्याआधी सेन्सेक्समध्ये ३५० अंकांची घसरण झाली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५८ अंकांनी घसरला असून तो १४३४७ अंकांवर ट्रेड करत आहे.

सेन्सेक्स मंचावरील १८ शेअर घसरले आहेत. ज्यात कोटक बँक बजाज फायनान्स, नेस्ले, भारती एअरटेल, एल अँड टी , बजाज ऑटो, मारुती, टीसीएस, एसबीआय, ओएनजीसी , टेक महिंद्रा, एचयूएल, एचडीएफसी, एचडीएफसी बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला पॉवरग्रीड, एशियन पेंट, टायटन, एचसीएल टेक, सन फार्मा, डॉ. रेड्डी लॅब, अल्ट्रा टेक सिमेंट हे शेअर तेजीत आहेत.

आज चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात १२ पैशांचे अवमूल्यन झाले. तो ७५.०६ पर्यंत खाली घसरला. परकीय गुंतावूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला असून त्यामुळे डॉलरची मागणी वाढली असल्याचे चलन बाजार विश्लेषकांनी सांगितले.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर ५९ शेअरने वषभराची नीचांकी पातळी गाठली. ज्यात अमृतांजन हेल्थकेअर, जेएसडब्ल्यू स्टील, सुवें लाईफ सायन्स, बारामपूर चिनी या शेअरचा समावेश आहे. धातू क्षेत्रात मात्र आज खरेदीचा ओघ आहे. निफ्टीवर हिंदुस्थान झिंक, नाल्को, हिंदुस्थान कोपर, सेल, टाटा स्टील आदी शेअर २ ते ७ टक्क्यांनी वधारले आहेत. त्याशिवाय इंडियन हॉटेल्स, डेल्टा कॉर्प, लेमन ट्री हॉटेल्स, आयआरसीटीसी, महिंद्रा हॉलिडे या शेअरमध्ये तेजी आहे.

दरम्यान, गुरुवारी बँका आणि धातू क्षेत्रातील शेअरमधील तेजीने आज सेन्सेक्स आणि निफ्टीला सावरले होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३७४ अंकांनी वधारला. तो ४८०८० अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०९ अंकांच्या वाढीसह १४४०६ अंकावर बंद झाला होता.

blank