तिरोडा- कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हीशिल्ड’ घेण्यासाठी नोंदणी करून नागरीक उपजिल्हा रूग्णालय तिरोडा येथे पोचले. मात्र, रूग्णालयात चिठ्ठी काढण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नागरिकांची खिडकीवर एकच गर्दी झाली. एकीकडे सामाजिक अंतर पाळण्याचे शासकीय निर्देश असतांना शासकीय रूग्णालयातच त्याला हरताळ फासला जात आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सुद्धा याकडे दुर्लक्षच केले. विशेष म्हणजे, नोंदणी खिडकीवर पुरूष व महिलांसह वृद्धांसाठी वेगळ्या रांगेचे फलक लावण्यात आले. हे फलक नावापुरतेच आहेत. नोंदणी खिडकीवरच उशीर लागत असल्याने वयोवृद्धांसह नागरीकांना दीड ते दोन तास ताटकळत राहावे लागले. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी एकदोन व्यक्तींना भोवळ सुद्धा आली. रूग्णालयातील या अव्यवस्थेकडे वैद्यकीय अधिक्षकांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासन सामाजिक अंतर पाळ्यासाठी आवाहन करून कोव्हीड प्रतिबंधासाठी अविरत प्रयत्नरत असतांना खुद्द शासकीय रुग्णालयातच त्याचा फज्जा उडविण्यात येत अाहे.





