एकस्तर पदोन्नतीच्या नावाखाली होणारी वसुली थांबवा

0
91

गडचिरोली -चटोपाध्याय वेतन श्रेणी लागल्या नंतर सुद्धा एकस्तर वेतन श्रेणी कायम ठेवण्यासंदर्भात तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी लागल्यानंतर एकस्तर पदोन्नतीच्या नावाखाली अतिरिक्त प्रदानाची वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघच्या वतीने आ. डॉ. देवराव होळी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघच्या वतीने एकस्तर वेतनश्रेणी कायम ठेवण्यासह विविध मुद्याच्या अनुषंगाने आमदार डॉ. देवराव होळी यांना आज ३0 मे रोजी निवेदन सादर करुन सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील हजारो पात्र शिक्षकांना चटोपाध्याय आयोगांतर्गत नुकतेच वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मंजुर करण्यात आला. त्यामुळे आपली एकस्तर वेतनश्रेणी बंद होणार असुन लाखो रुपये वसुल होणार, अशी भिती शिक्षक वर्गात निर्माण झालेली आहे. नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या अ ते ड संवर्गातील अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रोत्साहनपर योजना महाराष्टृ शासनाने ६ऑगष्ट २00२ च्या शासन निर्णयानुसार लागु केलेल्या आहेत.
त्यात एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ आहे. चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी यापुर्वी मंजुर करण्यात आली नसली तरी ऑगष्ट २00२ पासुन एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ जिल्ह्यातील शिक्षक/कर्मचारी घेत आहेत. चटोपाध्याय आयोगांतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुर केल्यामुळे नव्याने वेतन निश्‍चिती करण्यात येणार आहे. यामुळे बर्‍याच शिक्षकांच्या कमी झालेल्या वेतनवाढीचा फरक म्हणून अतिरिक्त प्रदानाची वसुली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्ग संभ्रमात आहे.
एकस्तरची वेतनश्रेणी आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणार्‍या शिक्षक/ कर्मचार्‍यांकरीता प्रोत्साहनपर योजना आहे. १0 ऑगष्ट २0२0 च्या शासन निर्णयानुसार चुकीने लाभ दिले असल्यास चुकीची दुरुस्ती करता येईल असे स्पष्ट आहे. मात्र, अतीप्रदान वसुलीचा उल्लेख नाही. चटोपाध्याय आयोगांतर्गत वरिष्ठ श्रेणी लागु केल्यानंतर एकस्तर पदोन्नतीच्या नावाखाली अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये. अशी मागणी निवेदनातून केली आहे.
आमदार डॉ. होळी यांनी जि.प.चे मुख्यलेखा तथा वित्त अधिकारी गायकवाड यांचेशी दुरध्वनीद्वारे चर्चा करून या संदर्भात जि.प. प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्राथमिक शिक्षक संघाच्या विनंतीवजा आग्रहपुर्वक मागणीनूसार आमदारांनी या मुद्याच्या संदर्भात सीईओ यांचेशी सुद्धा लवकरच चर्चा घडवुन आणण्याचे आश्‍वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिलेले आहे. तसेच ग्रामविकास मंत्री व वित्त मंत्री यांचेकडे जिल्ह्यातील शिक्षकांना चटोपाध्याय वेतन श्रेणी लागल्यानंतर सुद्धा एकस्तर वेतन श्रेणी कायम ठेवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. होळी यांनी उपस्थित शिष्टमंडळाला सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हासल्लागार तथा प्रभारी केंद्रप्रमूख केंद्र कसनसुरचे जनार्धन म्हशाखेत्री, प्राथमिक शिक्षक संघाचे मुलचेरा तालुकाध्यक्ष गोपाल डे, चामोर्शी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका सरचिटणीस मारोती वनकर, तालुका युवका आघाडी अध्यक्ष सुजीत दास आदी पदाधिकारी उपस्थित होते.