रेल्वेने दारूची तस्करी करणार्‍यास अटक, 4250 रूपयांचा माल जप्त

0
30

गोंदिया, दि.4 : रेल्वेने दारूची तस्करी करणार्‍या इसमास गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून एकूण 4250 रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, 3 जून रोजी दुपारी 1 वाजता गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॉटफार्म क्रमांक 1 वर करण्यात आली. रणबीरसिंग दलिपसिंग चौवकडायत (वय 35) रा. आरटीओ ऑफिस, फुलचुर नाका, गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर असे की, लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाणे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस अंमलदार ओमप्रकाश सेळोटे, चंद्रकांत भोयर, पोलीस शिपाई कुणार गिरणवार हे गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात व प्लॉटफार्मवर पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान आरोपी एक काळ्या रंगाची बॅग घेवून प्लॉटफार्म क्रमांक 1 च्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून हावडाकडे जाणार्‍या गाडीत चढण्यासाठी प्लॉटफार्म क्रमांक 4 कडे जात होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आवाज देवून त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने बॅग तेथेच सोडून पळ काढला. पोलीस स्टाफने धावत जावून त्याला पकडले.

पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारल्यावर त्याने रणबीरसिंग चौवकडायत रा. आरटीओ ऑफिस फुलचुर नाका गोंदिया असे सांगितले. तसेच संशयातून त्याच्या बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात विदेशी दारूच्या 2 लीटरच्या 3 प्लास्टीक बाटल्या मिळाल्या. प्रती बाटल 1350 रुपये असा बॅगसह एकूण 4250 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, तो गोंदियातून दारू खरेदी करून परराज्यात दुर्ग येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात होता. त्यावरून लॉकडाउन काळात दारूबंदी असताना परराज्यात दुर्ग येथे दारू विक्री करण्यासाठी घेवून जात असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 अ, ई, 66 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, पोलीस उपाधीक्षक एस.व्ही. शिंदे, प्रभारी अधिकारी संदीप गोंडाणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस अंमलदार ओमप्रकाश सेळोटे, चंद्रकांत भोयर, कुणाल गिरणवार यांनी केली.