41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News सोमवारपासून 13 जिल्हे अनलॉक!:राज्य सरकारची मध्यरात्री अधिसूचना, राज्यभरात 7 जूनपासून अंमलबजावणी

सोमवारपासून 13 जिल्हे अनलॉक!:राज्य सरकारची मध्यरात्री अधिसूचना, राज्यभरात 7 जूनपासून अंमलबजावणी

0
391

blank

मुंबई,दि.05ः- राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासंबंधीची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री काढली. यानुसार रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर तसेच रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड या निकषाआधारे जिल्ह्यांची विभागणी होईल. यात उपरोक्त निकषांआधारे पाच टप्पे करण्यात आले असून त्यानुसार निर्बंधांचे स्वरूप लागू असेल. उदा. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के व ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असतील त्या जिल्ह्यांत जवळपास पूर्ण अनलॉक असेल. याआधारे पुढील चार टप्पे असतील. यानुसार गोंदियासह भंडारा जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश होत असल्याने जिल्ह्यात बहुतांश कठोर निर्बंध शिथिल होतील. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना काढण्यात आली.

निर्बंध शिथिल करण्यासाठीचे टप्पे
1.
 पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के व ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
2. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के व ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
3. पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के व ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील.
4. पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के व येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील.
5. पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.

अनलाॅकचे नियम पाच टप्प्यांत असतील; पहिल्या टप्प्यात काय सुरू ?
अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. रेस्टॉरंट, माॅल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खासगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शूटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे. ई-कॉमर्स सुरू राहील. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहेत. बस १०० टक्के क्षमतेने सुरू होतील. इतर राज्यांतून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहील.पहिल्या गटातील जिल्हे – अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा.

 

दुसऱ्या टप्प्यात काय सुरू राहील
अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेसह सुरू. मॉल्स, थिएटर्स ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील. लग्नकार्यात हॉलच्या ५०% क्षमता वा १०० माणसांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. कार्यालयांत १००% उपस्थिती असू शकेल. बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण. ई-सेवा पूर्ण जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने सुरू. बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने. जिल्ह्याच्या बाहेर खासगी कार, बसेस, लाँग ट्रेन, खासगी गाड्या, टॅक्सी यांना परवानगी आहे. बांधकाम, कृषी कामे खुली करण्यात आली आहेत. ऑनलाइन, ई-कॉमर्स सुरू करण्यात आले आहे. जिम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमेतेने सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय बस १०० क्षमतेने टक्के सुरू असतील. उभे राहून प्रवास करता येणार नाही.दुसऱ्या गटातील जिल्हे – औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी.

तिसऱ्या टप्प्यात काय सुरू राहील
अत्यावश्यक दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के खुली, दुपारी २ पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार-रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. माॅर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा. खासगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू. आऊटडोअर खेळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ५ ते ९ सुरू असतील. स्टुडिअोत चित्रीकरण परवानगी, मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्यंत खुले असणार. हे सोमवार ते शुक्रवार या वेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई-कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरू असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.तिसऱ्या गटातील जिल्हे – अकोला, अमरावती, बीड, वाशिम, यवतमाळ.

चौथ्या टप्प्यात काय सुरू राहील?
अत्यावश्यक सेवा ४ वाजेपर्यंत सुरू असतील. इतर दुकाने बंदच राहतील. चित्रपटगृहे, माॅलही बंदच राहतील. रेस्तराँमध्ये फक्त पार्सललाच परवानगी असेल. सरकारी, खासगी कार्यालयांत २५ टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर सकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरू राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न समारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला २० लोक उपस्थित राहू शकतील. संचारबंदी लागू असणार आहे. सलून, जिम दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. बसेस ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. बसमध्ये प्रवाशांना उभे राहता येणार नाही.चौथ्या गटातील जिल्हे – पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.

पाचव्या टप्प्यात काय सुरू राहील
सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहतील. शनिवार-रविवार मेडिकल वगळता सर्वच बंद. इतर सर्व दुकाने बंदच राहतील. रेस्तराँत फक्त पार्सलला परवानगी. संचारबंदी लागू. इतर सर्व बंद असेल.

blank