कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली सांत्वन भेट

0
50

गोंदिया,दि.7 : गोंदिया तालुक्यात कोरोनामुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांची जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी प्रशासनाच्या वतीने सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबियांना मानसिक आधार दिला. कोरोना झाल्यामुळे परिवारातील प्रमुख कमावता व्यक्ती गमावल्यामुळे तसेच या भीतीपोटी सामाजिक भीती निर्माण होऊन संबंधित परिवाराचे मानसिक खच्चीकरण झालेले असल्यामुळे प्रशासनातर्फे सदर परिवारांची भेट घेण्यात आली. यामुळे अशा परिवारांना मानसिक आधार मिळून इतर नागरिकांच्या मनात असलेली भीतीदेखील घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अशा परिस्थितीमध्ये कर्ता पुरुष गमावलेल्या परिवारातील त्यांच्या विधवा पत्नीस विशेष सहाय्य योजने अंतर्गत तात्काळ लाभ मिळवून देण्याबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून शासनाच्या विविध निकषांच्या अनुषंगाने देखील संबंधित परिवारास लाभ देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
सदर भेटीदरम्यान संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी यांना त्यांच्या गावात कोरोनाचा प्रसार कसा थांबवण्यात यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
सदर भेटीदरम्यान तहसीलदार आदेश डफळ, अप्पर तहसीलदार अनिल खडतकर, मंडळ अधिकारी एन.बी. वर्मा, अव्वल कारकून आशिष रामटेके व महसूल सहाय्यक मुकुंद तिवारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.