
चार वर्षांपासून रखडले विद्युत ट्राॅन्सफार्मर, रस्ता बांधकाम, दररोज घ्यावा लागतो जीव मुठीत
गोंदिया, ता. 7 ः येथील शहीद भगतसिंह वाॅर्ड राजाभोज काॅलनी समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. विद्युत ट्राॅन्सफार्मर, सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी चार वर्षांपासून वाॅर्डवासी नगरसेवकाकडे निवेदनातून करीत आहेत. परंतु, आश्वासनापलिकडे काहीही झाले नाही. त्यामुळे काॅलनीवासींनी थेट नगराध्यक्षांना भेटून समस्यांचे निवेदन दिले. या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.
शहीद भगतसिंह वाॅर्ड, राजाभोज काॅलनी ही ३०० ते ४०० घरांची वसाहत आहे. १०० च्या वर नवीन घरांचे बांधकाम सुरू आहे. इतक्या मोठ्या काॅलनीसाठी विद्युत विभागाचे एकच ट्राॅन्सफार्मर आहे. परिणामी, कमी दाबाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कुलर, पंखे तर चालतच नाहीत. शिवाय घरगुती बोरवेलचे पंपही चालत नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांपासून काॅलनीवासी नगरसेवकाकडे ट्राॅन्सफार्मरसाठी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, आश्वासनाशिवाय अद्याप काहीही मिळाले नाही.
गोंदिया, तिरोडा, रिंग रोड मुख्य रस्त्यावरून राजाभोज काॅलनीमध्ये नागरिकांना दररोजच्या रहदारीसाठी एकच मुख्य रस्ता आहे. खडीकरणामुळे रस्त्यावर मोठमोठे दगड बाहेर आले आहेत. मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सिमेंटच्या पक्क्या रस्त्याचे बांधकाम होणे गरजेचे झाले आहे. असे असताना रस्ता दुरुस्तीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत कित्येकदा नगरसेवकाला निवेदन देण्यात आले. प्रत्येकवेळी आश्वासन मिळाले. मात्र, आश्वासनांची पूर्ती झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यात काॅलनीबाहेर जाणाऱ्या शाळकरी मुले, कमचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच बाहेर पडावे लागत आहे.
दरम्यान, नगरसेवकाला सांगूनही समस्यांवर तोडगा निघत नसल्याने काॅलनीवासींनी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना भेटून निवेदन दिले. त्यांना निवेदन देताना लोकचंद बिसेन, अशोक तईकर, गणेश बिसेन, महेंद्र ठाकरे, प्रवीण मुजारिया, दिनेश रहांगडाले, राजीव ठकरेले, तिरथ तिलगाम, अमित मंडल, रोशन भानारकर उपस्थित होते.
जिर्ण पूल धोकादायक
राजाभोज काॅलनीत येण्या-जाण्यासाठी एकमेव अरुंद पूल आहे. या पुलाची अवस्था अतिशय दयनिय आहे. मोठ्या भेगा पडल्या असून, पूल जिर्ण झाला आहे. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणे धोकादायक आहे.