मराठा मोर्च्याआधी 15 जून रोजी ओबीसी मोर्चाची हाक- प्रकाश शेंडगे

0
45

मुंबई- येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा कोल्हापूरात काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली होती. 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावरून त्यांनी याची घोषणा केली होती. शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. त्यानंतर मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजही राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत सर्व समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय मांडण्यात आला. परंतू, यावर काही ठोस तोडगा निघत नसल्यानं आता ओबीसी समाजाने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या 15 जून रोजी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे.

एक डेडिकेटेड आयोग नेमून ओबीसींचा डेटा गोळा करावा. त्यानंतर हा डेटा सुप्रीम कोर्टाला सादर करावा. तरच ओबीसींचे आरक्षण टिकेल. सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही तर येत्या 15 तारखेला ओबीसी समाज रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करेल आणि याची जबाबदारी सरकारचीच असेल, असा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, आणि पदोन्नतीतील आरक्षण या तीनही विषयावरून ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत आलं आहे. तर पदोन्नतीतील आरक्षणावरून ठाकरे सरकारला खुद्द काँग्रेसच्या दबाबचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे भाजपने ओबीसी आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी मोर्चेबांधणी चालू केली आहे.