
- कृषि विभागाचे आवाहन
वाशिम, दि. १० : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची खरीप हंगाम २०२१ मधील शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. शेतकरी बांधवांनी शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठांची खरेदी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच करावी. सर्वसाधारण खरीपाची पेरणी ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करण्याबाबतची शिफारस कृषि विद्यापीठाने केली आहे. जिल्ह्यात ९ जून २०२१ पर्यंत ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ४६ महसूल मंडळापैकी नागठाणा, रिसोड, गोवर्धन, रिठद, कवठा, शिरपूर, मंगरूळपीर, शेलू, पोटी, मानोरा, शेंदुर्जना व गिरोली या महसूल मंडळात ७५ मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी पेरणी करीत आहे. प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, नागपूर यांनी हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भात १० ते १३ जून दरम्यान वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वारेसुद्धा ताशी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वाहणार आहे. राज्यस्तरावर सुद्धा कृषि विभागाच्या वतीने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी १७ जूनपर्यंत पेरण्या करण्यात येऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनी पुढील तीन-चार दिवसात पेरणी केल्यास अतिवृष्टीमुळे पेरणी दडपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.