36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home क्रीडा सवलतीचे वाढीव गुण प्रस्ताव 21 जूनपर्यंत सादर करावे

सवलतीचे वाढीव गुण प्रस्ताव 21 जूनपर्यंत सादर करावे

0
28

वाशिम, दि. 14  : इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण अर्थात सवलतीचे  वाढीव गुण शासन स्तरावर देण्याबाबत आयुक्त, क्रीडा व युवक संचालनालय, पुणे यांनी कळविले आहे. शासन निर्णयानुसार शैक्षणिक सत्रामध्ये खेळाडू विद्यार्थ्यांचा किमान सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक सत्र सुरू झालेले नसल्याने खेळाडू विद्यार्थ्यांचा खेळांमध्ये सहभाग होऊ शकला नाही.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांना आदेश देण्यात आले आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र( इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता आठवी व इयत्ता नववीमध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व त्या विद्यार्थ्यांना सन 2020-21 करीता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावे.

सन 2020- 21 या वर्षात इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 12 वी पूर्वी इयत्ता अकरावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा. अशा विद्यार्थ्यास सन 2020-21 या वर्षासाठी सवलतीचे  क्रीडा गुण देण्यात यावे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी कळविले आहे.

विभागीय शिक्षण मंडळाकडे 25 जून 2021 पर्यंत सर्व प्रस्ताव सादर करावयाचे असल्याने सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी सन 2020 – 21 मध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे अनुक्रमे वर्ग 8 ते 9 वी आणि अकरावीमधील खेळाच्या प्राविण्य प्रमाणपत्राच्या प्रति मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याकडून साक्षांकित प्रस्ताव द्विप्रतीत 21 जून 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावे. वरील मुदतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही, असे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.

blank