
सडक अर्जुनी,दि.18 : तालुक्यातील म्हसवानी येथील खुमराज बलिराम रहांगडाले यांचा १३ जून रोजी सायंकाळी खोडशिवणी म्हसवानी मार्गावर खून करण्यात आला होता. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने पाच आरोपींना गुरुवारी (दि. १७) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये योगेश फागुलाल बोपचे (२७) गर्रा,ता.गोंदिया, पोमेश पन्नालाल पटेल (२५)मरघट रोड बजाजवार्ड गोंदिया,गोविंदा निमावत(23) व गणेश बंडू येटरे(20)बसंतनगर,गोंदिया यांच्यासह अन्य एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.याप्रकरणातील 3 आरोपींना 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार म्हसवानी येथील खुमराज बलिराम रहांगडाले हे १३ जून रोजी सायंकाळी आपल्या आजारी मुलीला औषध आणण्यासाठी खोडशिवणी येथे गेले होते. मात्र, ते घरी परतलेच नाहीत. दरम्यान, त्यांचा मृतदेह खोडशिवणी – म्हसवानी मार्गावर आढळला होता.शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा खून करण्यात आल्याची बाब पुढे आल्यानंतर याप्रकरणी आरोपी विरूद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये दाखल करण्यात आला. यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तपासादरम्यान मृतक व आरोपी यांच्यामध्ये जमिनीवरुन वाद सुरू असल्याची माहिती मृतकाचा मुलगा निखिल खुमराज रहांगडाले व मुलगी दामिनी उर्फ स्वाती यांनी दिली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे या दिशेने फिरविली.
योगेश बाबूलाल बोपचे याची चौकशी करून विचारपूस केली असता त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने खुमराज रहांगडाले याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या दोन्ही आरोपींशी चौकशी केली असता त्यांनी यात सहभागी असल्याची कबुली दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अशोक बनकर,एसडीपीओ जालंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन वागंडे,सह.पोलिस निरिक्षक संजय पांढरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सफौ. कापगते, लिलेंद्र बैस, पोहवा राजेंद्र मिश्रा, पोना. तुरकर, बिसेन तथा चालक पांडे यांनी केली.





