29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

0
24

blank

मुंबई : एकीकडे काँग्रेसने स्वबळाचा सूर आवळलेला असला तरी दुसरीकडे शिवसेनेशी हातमिळवणी कायम ठेवण्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्याच राष्ट्रवादीला झटका दिल्याच्या चर्चा सुरु असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी परळमधील टाटा रुग्णालयातील कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या 100 खोल्या राखीव ठेवणार असल्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला होता. पण मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

आता खुद्द जितेंद्र आव्हाड यांनीच या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या ठिकाणी कॅन्सरग्रस्त रुग्ण राहणार असल्याचे मत पूर्णपणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता नेमके कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठीच्या घरांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्तांसाठी या म्हाडाच्या खोल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानंतर राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचे वाटपही करण्यात आले होते. पण या विरोधात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. कॅन्सरग्रस्तांसाठी ज्या इमारतीमधील खोल्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या, त्या इमारतीमधील रहिवाशांची तक्रार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली नाही आणि परस्पर या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे आता महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणतीही चर्चा न करता राष्ट्रवादीने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतमतांतरे आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लवकरच यासंदर्भातील खुलासा आणि एवढ्या मोठ्या निर्णयाला स्थगिती का देण्यात आली, याबाबतचे स्पष्टीकरण जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

blank