33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News सर्व जिल्हे पुन्हा तिसऱ्या टप्प्यात…नवीन नियमावली

सर्व जिल्हे पुन्हा तिसऱ्या टप्प्यात…नवीन नियमावली

0
91

blank

– कधीही लागणार निर्बंध
– ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई-  राज्यामध्ये कोरोनाची  आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.  काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे. टप्पा कमी करायचा असेल तर दोन आठवड्याचा ट्रेंड चेक करावा लागणार असल्याची माहिती आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आलं आहे.

आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच असणार आहेत. महाराष्ट्र सरकारने ४ जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती. यामध्ये त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीचे प्रमाण विचारात घेऊन सर्वात कमी दर असणारे जिल्हे पहिल्या गटात यानुसार पाचव्या गटापर्यंत विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार, या प्रत्येक गटानुसार निर्बंध अधिकाधिक कठोर होत गेले. मात्र, आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचे प्रमाण कितीही कमी असले, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत.
 काय आहेत नवे नियम
स्थानिक प्रशासनाला निर्बंध कमी करण्याबाबत किंवा वाढवण्याबाबत फक्त RT-PCR चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनाच आधारभूत मानण्याचे निर्देश
पात्र नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे
लसीकरणासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे
टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे
हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे
गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे
कंटेन्मेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घ्या. जेणेकरून ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील, असे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.

blank