
वाशिम, दि. ०२ : वाशिम जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमीच असल्याने बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून कोरडवाहू पद्धतीने केली जाते. जिल्ह्याची सोयाबीन आणि तूर ही मुख्य पिके. आता जिल्ह्यातील काही शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करू लागले आहेत. वाशिमपासून दक्षिणेकडे १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या टो या गावातील काही युवा शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी कुक्कुटपालन या शेतीपूरक व्यवसायाची कास धरून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. यातील काही युवा शेतकरी कुक्कुटपालनातून अंडी विक्री तर काही मांस विक्रीसाठी कुक्कुटपालन करीत आहे.
टो या गावाची ओळख काही वर्षांपूर्वी रेशीम कोश उत्पादकांचे गाव म्हणून होती. रेशीम विकास विभागाने या गावातील जवळपास ४० शेतकऱ्यांना मखमली क्रांतीचा मार्ग दाखविला. तुती लागवड, रेशीम किडे संगोपन, रेशीम कोश उत्पादनासाठी टिनाचे शेड देखील बांधून दिले ते शासकीय अनुदानातून. जवळपास ५ ते ६ वर्ष इथल्या शेतकऱ्यांचे मन रमले ते रेशीम कोश उत्पादनात. वर्षाकाठी या व्यवसायातून प्रत्येक शेतक-याला दोन ते अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. गावातील काही लोकांना या व्यवसायातून रोजगार देखील मिळाला. काही कारणाने रेशीम कोश उत्पादनापासून हे शेतकरी माघारी फिरले.
आता नव्याने शेतीपूरक दुसरा व्यवसाय आपण केला पाहिजे आणि त्यामधून आपण पुन्हा स्वावलंबनातून आर्थिक समृद्धीचा मार्ग शोधला पाहिजे, हा विचार काहीच्या मनात आला. त्यापैकी केशव काकडे या युवा शेतकऱ्याने ठरविले की, आपल्या शेतामध्येच २० फूट बाय ५० फूट आकाराचे कायमस्वरूपी शेड आहे. यामध्ये आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येईल. मनाशी निश्चय केला आणि नाशिक येथून कुक्कुटपालनाचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले सन २०१८-१९ मध्ये केशवने देशी कुक्कुट संगोपनाला सुरुवात केली. जवळपास २०० पक्षी केशवने करडा येथील कृषी विज्ञान केंद्रातून. डीपी-क्रॉस, कावेरी आणि काही कडकनाथ जातींची पक्षी खरेदी केले. केशवसोबत या व्यवसायासाठी जोडले गेले ते सखाराम काकडे आणि आश्रू काकडे हे युवा शेतकरी. त्यांनी सुद्धा आपल्या शेतात असलेल्या टिनाच्या शेडमधील देशी कुक्कुट संगोपनाला सुरुवात केली. केशव काकडे, सखाराम काकडे आणि आश्रू काकडे यांच्यासारखेच गावातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टिनाचे शेड आहे, त्या संतोष काकडे, शेख रउफ, गणेश इंगळे, मारूती काकडे, श्यामा काकडे व रवी काकडे या शेतकऱ्यांनी देखील देशी कुक्कुटसंगोपनाला सुरुवात केली.
केशव, सखाराम आणि आश्रू काकडे यांनी ग्राहकांची गरज लक्षात घेऊन केवळ अंडी उत्पादनाचा मार्ग निवडला. पक्षी साडेचार महिन्याचे झाल्यानंतर त्यातील कोंबड्या अंडी उत्पादनासाठी ठेऊन तर देशी जीवंत कोंबडे ग्राहक उपलब्ध होताच ४०० ते ५०० रुपये नग याप्रमाणे विक्री करतात. देशी कोंबड्या ह्या काटक असल्यामुळे त्यांच्यावर रोगराई कमी प्रमाणात येत असल्याने शेतातील शेडमध्ये संगोपनाला सुरुवात केली. शेडच्या बाजूला असलेल्या खुल्या वातावरणात सुती जाडी बांधून कोंबड्या दिवसाला मोकळ्या सोडून खाद्य देणे सुरू केले. खाद्याचा खर्च देखील त्यांचा कमी असल्यामुळे त्यांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणे सोयीचे झाले. एक पक्षी खरेदी करण्यासाठी त्यांना २५ ते ३० रुपये मोजावे लागले. साडेचार महिने पक्षांचे संगोपन केल्यानंतर अंडी उत्पादनाला सुरुवात झाली. डीपी-क्रॉस जातीची कोंबडी वर्षाकाठी २८० अंडी, कावेरी ३०० ते ३२० अंडी आणि कडकनाथ वर्षाला ३०० अंडी देत असल्यामुळे या तिघांच्या कुक्कुटपालनातून अंडी उत्पादनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली.
कुक्कुट संगोपनातून अंडी उत्पादनाचा चांगला मार्ग केशव, सखाराम आणि आश्रु काकडे यांना गवसला. जिल्ह्याचे ठिकाण असलेले वाशिम शहर थोडाफार अंतरावर असल्यामुळे अंडी विक्रीची बाजारपेठ त्यांनी वाशिम निवडली. आपल्या उत्पादित देशी अंडीचा प्रचार- प्रसार त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्यामुळे ग्राहक त्यांना मिळाले. कोरोना काळात अंडीला ग्राहकांची मोठी मागणी होती. उत्पादक ते थेट ग्राहक असा व्यवसाय त्यांचा सुरू झाल्यामुळे मध्यस्थांचे उच्चाटन झाल्याने त्यांना चांगला नफा मिळू लागला. एक अंडी दहा रुपये प्रति नग याप्रमाणे ग्राहक खरेदी करू लागले. प्रत्येक ग्राहक २ डझन पेक्षा जास्त मागणी करु लागले. केशव, सखाराम आणि आश्रू दर तीन दिवसांनी प्रत्येकी तीनशे अंडी वाशिम येथील ग्राहकांना देऊ लागले. टो येथील देशी अंड्याचा प्रचार-प्रसार वाशिम येथे मोठ्या प्रमाणात झाल्याने अंड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली. मागणी जास्त आणि उत्पादन कमी होत आहे. अंड्याच्या या व्यवसायातून तिघांनाही खर्च वजा जाता महिन्याला प्रत्येकी २० हजार रुपये अंडी विक्रीतून नफा मिळत आहे. ग्राहकांची मागणी आणि अंड्यातून मिळणाऱ्या नफ्यामुळे या व्यवसायाचा विस्तार करणार असल्याचे केशव, सखाराम आणि आश्रू यांनी सांगितले.
दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या केशवकडे सात एकर शेती. त्यापैकी तीन एकर ओलिताखाली असून गहू व हरभरा ही पिके घेतली जातात. सखारामचे शिक्षण पदवीपर्यंतचे. सखारामच्या संयुक्त कुटुंबात २० एकर शेती. यातील अर्धी शेती सिंचनाखाली असून गहू, हरभरा व थोडा भाजीपाला घेण्यात येते. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आश्रू काकडेची ६ एकर शेती. थोडीफार ओलिताची व्यवस्था असून हळदीचे उत्पादन घेतले जाते. हे तिघे जण आपल्या कोरडवाहू शेतीतून तूर व सोयाबीन ही पिके घेतात.
यासोबतच गावातील शेख रउफ, संतोष काकडे, गणेश इंगळे, मारूती काकडे, श्यामा काकडे व रवी काकडे देखील आपल्या शेतातील शेडमध्ये देशी कोंबड्यांचे संगोपन करून ठोक ग्राहकांना २०० रुपये किलो या भावात कोंबड्यांचे मांस विक्री करतात. किरकोळ ग्राहकाला जागेवरून पाचशे ते सातशे रुपये प्रति नग याप्रमाणे जिवंत कोंबडा जागेवरून विक्री करतात. गावातील काही युवकांनी अंडी उत्पादनासाठी तर काहींनी मांसाहारासाठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करून शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली आहे. या व्यवसायात त्यांना चांगला नफा मिळत असल्यामुळे हे सर्वजण या व्यवसायाचा विस्तार करीत आहे. टो या गावातील युवा शेतकऱ्यांनी शेतीपूरक म्हणून सुरू केलेला देशी कुक्कुटपालनाचा व्यवसाय इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.





