
पुणे-मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात भाजपावर तिखट शब्दांमध्ये टीका केली. त्यावर भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘पप्पू’ म्हणत त्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात.
पुण्यातील पत्रकार परिषदेला संबोधित करताना जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने आणलेल्या जप्तीसंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले कि, जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक आहे. अशा प्रकारे मातीमोल किंमतीने विकल्या गेलेल्या कारखान्यांची चौकशी करा, अशी मागणी मी केली आहे. मी जे पत्र केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना दिले, ती कारखान्यांची यादी पाच वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी तयार केली आहे.
ते पुढे म्हणाले, राज्यातल्या ३० साखर कारखान्यांची यादी अमित शाह यांची भेट घेऊन दिली असून या कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर लगेचच अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, मी यादी दिल्यानंतर हे झाल्याच्या चर्चेचा चंद्रकांत पाटील यांनी इन्कार केला. मी पत्र दिल्यानंतर देशाच्या सहकार मंत्रालयाचा कारभार अमित शाह यांच्याकडे गेला असे नाही. याचे नियोजन किमान वर्षभरापूर्वीपासून झाले असेल. या खात्यामुळे देशातील सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.





