
लखनौ- रविवारी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत अल कायदा संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक केल्यावर व मोठय़ा प्रमाणावर स्फोटके हस्तगत करण्यात आल्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम उत्तरपदेश व्यतिरिक्त हरदोई, सीतापूर, बाराबंकी, उन्नाव आणि रायबरेली या जिल्ह्यांसह लखनऊ आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेवरून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेले अल कायदाचे दहशतवादी उत्तर प्रदेशमधील लखनौसह काही जिल्ह्यांमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी दोन प्रेशर कुकर बॉम्बसह बरीच स्फोटके व विदेशी पिस्तूलेदेखील जप्त केली आहेत.
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) लखनौमध्ये छापेमारी केली. एटीएसने छापा टाकला त्या घरात सात लोक राहत होते आणि त्यातील पाच जण पळून गेल्याच्या वृत्तानंतर लखनऊ व त्याच्या आसपासच्या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी आतापयर्ंत दोन जणांना अटक केली आहे. शाहिद खान गुड्डू आणि वसीम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शाहिद पाच वर्षांपासून सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. तो टेलिग्रामद्वारे अल कायदा व पाकिस्तानी हस्तक अल-उल यांच्याशी बोलत होता. त्याला पकडण्यापूर्वी त्याने काही कागद व वस्तू जाळल्याची देखील माहिती समोर आली आहे. याशिवाय दोन प्रेशर कुकर बॉम्बसह बरीच स्फोटके, विदेशी पिस्तूल देखील जप्त करण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेश एटीएसचे आयजी जीके गोस्वामी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश आणि लखनऊमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. जिवंत बॉम्ब देखील हस्तगत करण्यात आलेला आहे. संशयित दहशतवाद्यांचे काश्मीर कनेक्शन आहे. हे स्लीपर सेल होते पण आता सक्रीय होऊन काम करत होते.





