
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत दुरावा निर्माण झालाय का अशी चर्चा रंगली होती. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाराजी दर्शवली होती. त्यातच आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविरोधात आहे. मात्र त्याचा असा अर्थ असा नाही की मी त्यांनी सरकारमध्ये केलेल्या चांगल्या कामांची निंदा करेन, नाही. तसं केलं तर ते चुकीचं ठरेल. मी आणि बाळासाहेबांनी असा कधीच विचार केला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
माझी कारकिर्द सर्वांसमोर आहे. विरोधक यांनी जे केलं ते सर्वच वाईट अशी माझी भूमिका कधी नव्हती. पण या काळात अनेक शोध लागत आहेत, पण पाण्याचा शोध नाही लागला. जे पाणी आहे ते नियोजन महत्त्वाचे आहे. प्रत्येक मंत्र्यांनी जनतेला काही ना काही दिलं पाहिजे, 25 वर्षानंतर महाविकास आघाडीचे नाव लक्षात राहिलं पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी मंत्र्यांना दिला आहे.
दरम्यान, दादा तुम्ही जेवणाचा विषय काढला. थोरात साहेब म्हणाले कोरोनामुळे जमलं नाही. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. कोरोनाची भीती बाळगू नका. आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.




