
नवरगाव कला येथील अन्यायग्रस्त महिलेची मागणी
गोंदिया,ता.21 गावातील एका व्यक्तीने जुन्या वादातून एका महिलेला भर चौकात मारहाण करीत तिचा विनयभंग केला. या घटनेला तब्बल दहा दिवसाचा काळ उलटला तरी विनयभंग करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने या विनयभंग करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोंदिया तालुक्यातील नवरगाव कला येथील अन्यायग्रस्त महिलेने पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
अन्यायग्रस्त सदर महिला आपल्या घरासमोर उभी असताना जुना वाद समोर करून गावातीलच आत्माराम वाढई नामक व्यक्तीने सदर महिलेचे केस ओढीत चौकात आणले व भररस्त्यात त्याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणाची तक्रार नोंदविण्यासाठी सदर महिला ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गेली असता सदर महिलेला तेथील पोलिसांनी तब्बल सकाळी ते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत ताटकळत ठेवल्याचा आरोपही या महिलेने लावला आहे. सदर व्यक्ती हा राजकीय वरदहस्त असलेला असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचे अधिकच मनोबल उंचावले असल्याची बाब समोर आलीआहे. एका गरीब महिलेवर सर्वांच्या डोळ्यादेखत अन्याय झाला असला तरी पोलिसांनी या प्रकरणाची साधी चौकशी सुद्धा केली नाही त्यामुळे पोलीस व त्या व्यक्तीचे आर्थिक देणे घेणे तर नाही ना अशी शंका गावकऱ्यांनी घेतली आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून विनयभंग करणाऱ्या आत्माराम वाढई यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्यायग्रस्त महिलेने पोलीस अधीक्षक व महिला आयोगाकडे पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे.





