
– अमृतसरवरून मागविले होते शस्त्र
अंजनगाव सुर्जी-अंजनगाव सुर्जी शहरातील बालाजी प्लॉटमधील 21 वर्षीय चेतन चंदू चंदनपत्री याच्या घरून 4 तलवार, 8 जंबिये व 2 कट्यार अंजनगाव पोलिसांनी शनिवारी दुपारी 1.30 वाजता जप्त करून 3 जणांना ताब्यात घेतल्याची धाडसी कारवाई केली.
दोन दिवसा पूर्वी विक्की वानखडे हा एका कँटीनमध्ये तलवार हाती घेऊन बसलेला असतानाचे छायाचित्र समाजमाध्यमावरील फेसबुकवर अपलोड करण्यात आले होते. पीएसआय सपकाळ यांनी गांभीर्य लक्षात घेऊन शोध घेतला असता विक्कीजवळून पंच गजानन हुरपडे व श्रीकांत नाथे यांच्या समक्ष परतवाडा मार्गावरील नवीन बसस्थानक परिसरातील पारीख पेट्रोल पंप जवळ एक तलवार जप्त करण्यात आली. विक्कीच्याच बयाणावरून चेतन चंदनपत्री याच्या घराची झडती घेतली असता चार तलवार व दहा निरनिराळे चाकू सापडले. या प्रकरणी विक्की वानखडेसह अजय अशोक आसोलकर, चेतन चंदनपत्री यांनाही सहआरोपी बनविण्यात आले.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांचे मार्गदर्शनात पीएसआय गणेश सपकाळ, पीएसआय मंजुषा ढोले, पीएसआय इम्रान इनामदार, पो.कॉ. पवन पवार, सरफराज शेख, वाहन चालक भूषण तायवाडे यांनी केली. आरोपींविरुद्ध आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोलताना पीएसआय गणेश सपकाळ म्हणाले की, सदर शस्त्र बाळगणार्यांची कसून चौकशी केली असता पंजाबमधील अमृतसर येथून डीटीडीसी या कोरीयर कंपनीच्या माध्यमातून खरेदी करून शस्त्र बोलविल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.





