
गडचिरोली— जिल्हा पोलीस दलासमोर नक्षल चळवळीचा त्याग करुन आत्मसर्मपण केलेल्या नक्षल सदस्यांना स्वयंरोजगाराकरीता पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आत्मसर्मपण शाखेच्या वतीने जे पुनर्वसनचे काम केले जाते, त्याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधीक्षक अंकित गोयल (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (भापोसे), समीर शेख (भापोसे.), सोमय मुंडे (भापोसे.) यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमीत महीला सदस्यांचे दोन बचत गट स्थापन करुन त्यांना स्वयंरोजगार मिळावा याकरीता ग्रामिण विकास मंत्रालय भारत सरकार यांचे अधिपत्याखालील स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आरसेटी गडचिरोली यांच्या माध्यमातुन १0 दिवस कालावधीचे पापड, लोणचे, मसाला तयार करण्याचे २५ आत्मसमीत नक्षल महीला सदस्यांना प्राधान्य व विशेष बाब म्हणुन मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हयातील नक्षल चळवळीत सहभागी असलेल्या जहाल नक्षली महीला ज्या आत्मसर्मपण करुन सर्वसामान्य जीवन जगत आहेत. त्यांचे पुनर्वसन करुन स्वयंरोजगार मिळावा याकरीता जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासन यांचे दिनांक १६/0२/२0२१ रोजी रोजगार मार्गदर्शन मेळावा मध्ये पोलीस अधीक्षक यांनी आत्मसमीतांच्या आवडी नुसार प्रशिक्षण, आत्मसमीतांच्या नवजीवन वसाहत येथे पायाभुत सुविधा (रस्ता, विदयुतीकरण इत्यादी) तसेच जे काही आम्ही तुमच्या पुनर्वसनसाठी करु शकतो ते करु असे आश्वस्त केले होते त्याचाच एक भाग म्हणुन आत्मसमीत महीलांना स्वयंरोजगाराकरीता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन रस्ते व विदयुतीकरण नवजीवन वसाहत येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. १0 दिवसांचे पापड, लोणचे, मसाला प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केल्याने सहभागी महीलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक चेतन वैद्य हे उपस्थित होते. गोयल यांनी आत्मसमीतांच्या पुनर्वसनाकरीता आगामी काळात विविध प्रशिक्षण आयोजित करुन मोठया प्रमाणावर स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पोलीस प्रयत्नशिल आहे असे सांगुन नक्षल चळवळीचा त्याग करुन सर्वसामान्य सारखे जीवन जगण्यासाठी नक्षलवादयांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसर्मपण करण्याचे आवाहन केले.





