
मुंबई-भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांवर आक्रमक झालेले शिवसेनेचे नेत आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. ठाण्यातील विशेष दिवाणी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला.
किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप निराधार, बेजबाबदार आहेत असे सरनाईकांनी म्हटले आहे. सोमय्या यांनी खोट्या वक्तव्यांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करू, असे सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात, ठाण्यातील न्यायालयात 100 कोटींचा विशेष दिवाणी दावा प्रताप सरनाईक यांनी दाखल केला आहे. रीतसर प्रक्रिया करून हा दावा नुकताच दाखल केला गेला असून, सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या आरोपांबाबत न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे.
सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सरनाईक यांनी सोमय्या यांना नोटिस पाठवली होती. बदनामी केल्याबद्दल माफी मागावी, असे या नोटिसमध्ये म्हटले होते. सरनाईक यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसला सोमय्या यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी 100 कोटींचा दावा सोमय्यांच्या विरोधात दाखल केला आहे. त्यासाठी न्यायालयात सरनाईक यांनी जवळपास 3 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले आहे.





