
टोकियो, –भारताच्या पी. व्ही. सिंधूने रविवारी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा इतिहास रचला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले. रविवारी कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओवर 21-13, 21-15 अशी मात केली. सिंधूचे हे सलग दुसरे ऑलिम्पिकपदक ठरले. याआधीच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्यपदक पटकावले होते.
हैदराबादची 26 वर्षीय पी. व्ही. सिंधू दोन ऑलिम्पिक पदके पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली असून कुस्तीपटू सुशील कुमारनंतर दोन पदके जिंकणारी दुसरी भारतीय ऑलिम्पिकपटू ठरली आहे. सध्या सुरु असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलक मीराबाई चानूने भारतासाठी पहिले रौप्यपदक जिंकून दिल्यानंतर सिंधूने भारतासाठी दुसरे पदक जिंकून दिले. ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी महिलांच्या 49 किग‘‘ॅ वजनगटातील भारोत्तोलानात मीराबाईने रौप्यपदक जिंकले.
बॉक्सर लवलिना बोर्गोहेननेही उपांत्य फेरी गाठून भारतासाठी तिसरे पदक निश्चित केलेले आहे. सिंधूने सुरुवातीपासूनच आक‘मक खेळ दाखविला व बिंग जियाओ दबावाखाली असल्याचे दिसून आले. पहिल्या गेममध्ये सिंधूने 11-8 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या गेममध्ये सिंधूने बिंग जियाओला संधी दिली नाही व आघाडी कायम ठेवली. पहिला गेम 21-13 न जिंकला. दुसर्या गेममध्येसुद्धा सिंधूने 11-8 अशी आघाडी घेतली व हा गेमसुद्धा 21-15 ने जिंकून कांस्यपदक मिळविले. सिंधूशिवाय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. सुवर्णपदकासाठी चीन तायपेईच्या तई त्झु यिंग आणि चेन युफेई यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे.





