
नांदेड- किटक नाशके फवारताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. शेतकऱ्यांनी किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी व प्रतीबंधात्मक उपाययोजनेबाबत राज्य शासनाचा कृषि विभाग व जिल्हा परिषद कृषि विभागाच्यावतीने हाती घेतलेल्या प्रात्यक्षिक मोहिमेचा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम नांदेड तालुक्यातील सायाळ येथील मुंजाजी धुमाळ यांच्या शेतातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट दाखविण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी फवारणी करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगारानी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, गटातील जिल्हा परिषद सदस्य आदी उपस्थित होते. कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पांडागळे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी, सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळीच्या संदर्भात सविस्तर माहिती डॉ. बस्वराज भेदे यांनी दिली. कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.





