32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ आर्वीत रस्त्यासाठी दफन आंदोलन

आर्वीत रस्त्यासाठी दफन आंदोलन

0
39
आर्वी- आर्वी मतदार संघातील प्रहारचे नेते बाळा जगताप यांनी आज आर्वी येथे “दफन आंदोलन” केले. गेल्या तीन वर्षापासून आर्वी मतदार संघातील प्रमुख महामार्ग आर्वी – तळेगाव, आर्वी – कौडण्यपूर, आर्वी – वर्धा या रस्त्यांचे फिजत घोंगडे पडून आहे. गेल्या तीन वर्षापासून ठेकेदार कंपनी कडून तिन्ही रस्ते खोदून ठेवण्यात आले. मात्र त्या रस्त्याचे काम अजूनपर्यंत चालू केले नाही. परिणामी अनेक वाहन चालकांना अपघाताने गंभीर दुखापत, अपंगत्व आले. मात्र प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहे. पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने या तिन्ही रस्त्यावर सिमेटीकरण किंवा डांबरीकरण नसल्याने पूर्ण रस्ते चिखलमय झाले आहे. त्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदून ठेवल्यामुळे पावसाच्या पाण्याने खड्डे पूर्णतः भरून जातात त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मतदार संघातील नेते व स्थानिक प्रशासन या सर्व बाबतीत झोपेचे सोंग घेऊन वावरत आहे. या सर्वांना जागे करण्यासाठी आज आर्वी देऊरवाडा रस्त्यावर प्रहार च्या वतीने बाळा जगताप यांच्या नेतृत्वात “दफन आंदोलन” करण्यात आले. बाळा जगताप व देवा भलावी यांनी स्वतःला पूर्णतः जमिनीत गाडून घेतले होते त्यांचे फक्त हात हेच उघडे होते.
arvi_1  H x W:
आंदोलन सुरू असताना कार्यकर्त्यांची व बघणाऱ्यांची गर्दी एवढी होती की सदर रस्त्यावर एक तास जाम लागलेला होता. अचानक पणे बाळा जगताप यांनी घेतलेल्या या अफलातून आंदोलनात्मक पवित्र्यामुळे प्रशासन पूर्णपणे हादरले होते. बाळा जगताप यांना आंदोलन स्थळी भेटण्याकरिता आर्विचे तहसीलदार चव्हाण आले असता आंदोलनाची भीषणता बघता प्रशासनाची तारांबळ उडाली.
त्यानंतर आंदोलन स्थळी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैभवी वैद्य यांचे आगमन झाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनुले, उपनिरीक्षक ठावरे यांच्या उपस्थितीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. आंदोलन स्थळी भेट दिल्यानंतर कार्यकारी अभियंता वैद्य (NH) यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली असता बाळा जगताप यांनी लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर ठाम असल्याने आधिकारी वर्गाने सकारात्मक चर्चा करून येत्या काही दिवसात तिन्ही रस्ते वाहतुकीयोग्य करून देऊन बाकी कामे लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले. आश्वासनाअंती आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. दिलेल्या वेळेत जर रस्त्यांचे काम पूर्ण झाले नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात येईल त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा येवेली बाळा जगताप यांनी दिला. आंदोलन स्थळी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त हजर होता. आंदोलन स्थळी सुधीर जाचक, अरसलान खान, प्रशांत क्षीरसागर, सय्यद जुनेद, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व शेकडो नागरिक उपस्थित होते.